Home यवतमाळ मृद व जलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते होणार ‘गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन !

मृद व जलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते होणार ‘गाळमुक्त धरण’ पोर्टलचे उद्घाटन !

215

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनांची संपूर्ण माहिती तसेच प्रशिक्षण देणाऱ्या www.shiwaar.com या पोर्टलचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांच्या शुभहस्ते आज (शनिवार, दि. २२ मार्च २०२५) सकाळी १०.३० वाजता ऑनलाइन संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास श्री. गणेश पाटील, (सचिव- मृद व जलसंधारण विभाग), श्री. शांतिलाल मुथ्था (संस्थापक- भारतीय जैन संघटना), राज्यातील सर्व मा. जिल्हाधिकारी, मृद व जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी तथा जिल्हा-तालुका स्तरावरील सर्व प्रशासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत.

पाणी टंचाई, अवर्षणावर मात करून गावांना ‘पाणीदार’ करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक गावांमधील तलावातला गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणे, नाला खोलीकरण-रुंदीकरण करणे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजना कायमस्वरूपी ताकदीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेची जननजागृती, प्रचार-प्रसार तसेच संपूर्ण माहितीचे पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

‘या योजनेची सर्व माहिती सदरील पोर्टलवर अत्यंत सुटसुटपणे दिलेली आहे. ‘या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना भविष्यात निश्चितच फायदा मोठा होणार असून त्यासाठी सदरील पोर्टल महत्वाची भूमिका बजावणार आहे,’ असा विश्वास मंत्री श्री. संजय राठोड यांनी व्यक्त केला.