Home यवतमाळ माथनी जि.प.शाळेला प्रोजेक्टर भेट…!

माथनी जि.प.शाळेला प्रोजेक्टर भेट…!

100

शाळा व्यवस्थापन समितीचा पुढाकार.
—————————————-
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम भागातील शंभर टक्के कोलाम समाज बांधव वास्तव्यास असून आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा उदांत्त हेतू डोळ्यासमोर ठेवून येथिल कर्तव्यदक्ष व विद्यार्थीप्रिय जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनेश धोंगडे,सहाय्यक शिक्षिका हेमलता फुलझले यांची लोकसहभागाची चळवळ याला प्रतिसाद देत शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने पालक वर्गानी दिनांक १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी माथनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रोजेक्टर भेट दिले.
टिपेश्वर अभयारण्याच्या प्रवेश द्वाराजवळ सर्वांना परिचित असलेले शंभर टक्के कोलाम समाज बांधव वास्तव्यास असणाऱ्या माथनी गावात जिल्हा परिषद शाळा असून या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात.येथिल नागरिक शेती व मोलमजुरी करून जीवनमान जगत असतो.यात मुख्याध्यापक दिनेश धोंगडे हे रुजू झाल्यानंतर येथिल एकाच समाजाचे वास्तव व दुर्गम भागातील विद्यार्थी यावर चिंतन करून आपल्या मेहनतीची पराकाष्ठा लावून सर्व प्रथम येथिल नागरिकांना विश्वासात घेऊन आपल्या गावातील शाळेविषयी व या शाळेत विद्यार्जन करणाऱ्या त्यांच्या पाल्याबद्दल आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.याच संधीचे सोने करीत शाळेसाठी व विद्यार्थ्यासाठी काय करून घेता येईल याबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने लोकसहभागातून शाळेत अमुलाग्र बदल घडवून आणला.येथिल शाळेत कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक नानाविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेवून शाळेचे नावलौकिक केले.आज ही शाळा घाटंजी तालुक्याच्या गुणवत्ता पटलावर आहे.येथिल पालक मोलमजुरी करून जीवनमान जगत असले तरी आज ते आपला पाल्य चांगला शिकला पाहिजे यासाठी आपल्या तोडक्या पुंजितून शाळेसाठी लोकसहभाग देवून शाळेची दर्जा वाढविण्यासाठी सहकार्य करीत आहे.शाळेत गरजेच्या वस्तुसह नुकतेच १५ ऑगस्टला स्वतंत्र दिनी प्रोजेक्टर भेट दिले.शिक्षणाचा कसलाच गंध नसलेला समाज आज आपण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी व गावातील शाळेसाठी काही देणे लागतो यासाठी हा मोलाचा योगदान अर्पित करीत आहे.यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिनेश धोंगडे यांना सहाय्यक शिक्षिका हेमलता फुलझले मोलाचे सहकार्य करीत असून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कांता सुरपाम, उपाध्यक्ष राम सूरपाम, रवि सुरपाम,गणपत खडके,अशोक आत्राम यांनी अथक परिश्रम घेतले आहे.गावाचे सहकार्य याबाबत मुख्याध्यापक दिनेश धोंगडे व सहाय्यक शिक्षिका हेमलता फुलझले यांनी सर्वांचे आभार मानले आहे.या भरीव कार्याबद्दल सर्वत्र माथनी जिल्हा परिषद शाळेचे कौतुक होताना दिसत आहे.