
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी / यवतमाळ, 10 ऑक्टोंबर :- विद्या प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालीत यवतमाळच्या अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी पदवीधरांसाठी नुकताच पदवी वितरण समारंभ पार पडला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रख्यात चार्टर्ड अकाउटंट प्रकाश चोपडा आणि अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा यांची उपस्थिती होती. यावेळी पाहूण्यासोबत अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुणोत तसेच अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रभारी डॉ. संदीप नगराळे यांची सुद्धा मंचावर उपस्थिती होती.
याप्रसंगी नव पदवीधरांना मार्गदर्शन करतांना चार्टर्ड अकाउटंट प्रकाश चोपडा यांनी नुसती पदवी घेणे पुरेसे नसून त्याचा वापर स्वतःच्या तसेच समाजाच्या हितासाठी करावा, असे प्रतीपादन या वेळी केले.
देशाचा सर्वोच्च कायदा भारतीय संविधान हे समानतेची हमी देणारे ऐतीहासीक दस्तऐवज असून त्याची सदोदीत आठवण ठेवावी आणि त्याचबरोबर व्यावसायिक यशस्वीतेसाठी भारतीय करार कायदा, कंपनी कायदा, दिवाणी प्रक्रीया कायदा, फौजदारी कायदे याचा सखोल अभ्यास करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्यावसायिक नितीमत्ताही पालन करावे, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा यांनी पदवीकांक्षींचे अभिनंदन केले. तसेच समायोचीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ. विजेश मुणोत (घाटंजी) यांनी केले. तसेच महाविद्यालयात नव्याने सुरू झालेल्या चार डिप्लोमा विषयी माहिती दिली. तर प्रा. डॉ. संदीप नगराळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैशाली फाळे यांनी केले. संयोजनामध्ये डॉ. स्वप्नील सगणे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा. वंदना पसारी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला मोठया संख्येने पदवीधर तसेच नियमित विधी विद्यार्थी उपस्थित होते.












































