Home यवतमाळ घोटी ग्रामपंचायतच्या वादग्रस्त ग्रामसेविका यांची तडकाफडकी बदली; टिटवीचे ग्रामसेवक राजाराम बोईनवाड यांचे...

घोटी ग्रामपंचायतच्या वादग्रस्त ग्रामसेविका यांची तडकाफडकी बदली; टिटवीचे ग्रामसेवक राजाराम बोईनवाड यांचे कडे घोटी ग्रामपंचायतचा प्रभार..!

142

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी : घाटंजी तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेली वादग्रस्त ग्रामसेविका हिच्या शासकीय कर्तव्याची विशेष चर्चा तर घाटंजी तालुक्यात आहेच. पण सोबतच प्रत्येक शासकीय कर्तव्यावर सहपरिवार (पती समवेत) हजर राहण्याची विशेष सवय आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक कामकाजाचे कंत्राट पतीलाच मिळवून देण्याच्या कार्यपद्धतीमुळे, ग्रामस्थ पूर्णपणे आश्चर्यात असतात. अशातच खापरी येथील नागरिक अक्षय विरदंडे यांनी मातोश्री विजयाताई बेलोरकर इंग्रजी माध्यम शाळेच्या जागेसंबंधीच्या कागदपत्रांची मागणी माहितीचा अधिकार अधिनियम – 2005 अंतर्गत केली होती. विशेष म्हणजे अक्षय विरदंडे यांची आई खापरी येथेच अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. 22 जुलै रोजी झालेल्या अतीवृष्टिमुळे खापरी येथील अंगणवाडी केंद्र क्र. 1 ची इमारत पाण्याखाली बुडाली होती. अशातच दिनांक 23/07/2023 रोजी पाहणी व पंचनाम्याची इतर कारवाई करत असतांना, खापरी ग्रामपंचायतची वादग्रस्त ग्रामसेविका कांगणे हिने अक्षय विरदंडे यांची अंगणवाडी सेविका असणाऱ्या आईला ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविले. यावेळी त्यांच्या उद्धट वर्तनाची प्रचिती देत त्यांनी, जोरजोराने ओरड करून, दहशत निर्माण करून तुमच्या मुलाला समजावून सांगा यानंतर माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतला अर्ज आल्यास मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला पाहून घेईल, वाट लावून टाकील अशी उघडपणे अंगणवाडी सेविका असणाऱ्या अक्षय विरदंडे यांच्या आई श्रीमती जया हरिदास विरदंडे यांना धमकी दिली. सदर घटनेची तक्रार अंगणवाडी सेविका जया विरदंडे यांनी घाटंजी पोलीस स्टेशनला दाखल केल्यावरून, वादग्रस्त ग्रामसेविका हीचे विरोधात घाटंजी पोलीस ठाण्यात भादंविचे कलम 506 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा क्रमांक 564/2023, दिनांक 23/07/2023 रोजी दाखल केला आहे.

विशेष म्हणजे वादग्रस्त ग्रामसेविका घोटी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका पदी कार्यरत आहे. ग्रामपंचायत घोटी येथील सरपंच शुभांगी पुसनाके, उपसरपंच विनय जाधव व ग्रामपंचायत सदस्य पवन चव्हाण सह इतर ग्रामपंचायत सदस्यांनी वादग्रस्त ग्रामसेविकीची बदली करण्याची मागणी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, घाटंजी कार्यालयात केली होती. सोबतच बदली न केल्यास दिनांक 25/07/2023 पासून पंचायत समिती कार्यालयाच्या समोर उपोषणास बसण्याचा इशारा घोटी ग्रामपंचायतच्या सरपंच शुभांगी पुसनाके, उपसरपंच विनय जाधव व ग्रामपंचायत सदस्य पवन चव्हाण सह इतर ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता. या प्रकरणी दिनांक 24/07/2023 रोजी घाटंजी पंचायत समिती कार्यालयात सुनावणी होऊन, वादग्रस्त ग्रामसेविका हिचे कडून घोटी ग्रामपंचायतचा पदभार काढून घेण्यात आला. तसेच टिटवी येथील ग्रामसेवक राजाराम बोईनवाड यांना घोटी ग्रामपंचायतीचा प्रभार देण्यात आला आहे.

वादग्रस्त ग्रामसेविका दांपत्याने संयुक्तरीत्या कंत्राट घेऊन प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या प्रत्येक कामांतील भ्रष्टाचार बाहेर काढण्याकरिता वरिष्ठांकडे आवश्यक तो सर्व पत्रव्यवहार व आवश्यक ती सर्व कार्यालयीन व न्यायालयीन कारवाई करणार असल्याची माहिती यावेळी अक्षय विरदंडे यांनी दिली.

खापरी, ससानी, घोटी, टिटवी व कार्यरत असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या, ग्रामसेविकेवर कधी, काय व कोणती ? कारवाई प्रशासनाकडून करण्यात येईल, याची उत्सुकता ग्रामस्थांना आहे.

या संपूर्ण प्रकाराविषयीची संबंधित ग्रामसेविकेच्या निलंबनाची मागणी घेऊन तक्रारदार अक्षय विरदंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा, ठाणेदार घाटंजी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार अक्षय विरदंडे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागितलेली माहिती पूर्वी कार्यरत असलेल्या सचिवाकडून प्रभारात मिळालीच नसल्याचे संबंधित ग्राम सेविकेकडून, प्रभार हस्तांतरणाची यादी सोबत देऊन कळविण्यात आले आहे. प्रभार हस्तांतरणाच्या यादीमधे ग्रामपंचायत कार्यालय खापरीचे बरेचशे दस्तऐवजांचा उल्लेख नसल्याने, संपूर्ण रेकोर्डचा शोध घेण्याकरिता, संबंधितांविरुद्ध लवकरच फौजदारी खटला न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती तक्रारदार अक्षय विरदंडे यांनी दिली.