Home यवतमाळ पारवा पोलीस स्टेशन मधुन रेतीचे दोन टिप्पर अधिकार नसतांना सोडल्या प्रकरणी घाटंजीचे...

पारवा पोलीस स्टेशन मधुन रेतीचे दोन टिप्पर अधिकार नसतांना सोडल्या प्रकरणी घाटंजीचे निवासी नायब तहसीलदार आर. डी. मेंढे निलंबित..!

191

अयनुद्दीन सोलंकी

————————
घाटंजी : पारवा पोलीस स्टेशन मधील डिटेन केलेले दोन रेतीचे टिप्पर अधिकार नसतांना सोडल्या प्रकरणी घाटंजीचे निवासी नायब तहसीलदार रमेश मेंढे यांना अमरावतीच्या विभागीय आयुक्त डाॅ. निधी पाण्डेय यांनी निलंबित केले आहे.

पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी याशनी नागराजन यांचे कोणतेही कार्यालयीन आदेश नसतांना पारवा येथील ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिनांक 1जुन 2023 रोजी पत्र क्रमांक अका/ प्रस्तु-1/ कावी/ क्यु/ 2023 देउन व स्वतः चे अधिकार पत्र देऊन पारवा पोलीसांनी दोन्ही रेतीचे टिप्पर सोडुन दिले होते.

विशेष म्हणजे निवासी नायब तहसीलदार रमेश मेंढे यांना रेतीचे वाहने सोडण्याचा कोणताही अधिकार नसतांना त्यांनी असदहे्तुने अधिकाराचा गैरवापर केल्याने अमरावतीच्या विभागीय आयुक्त डाॅ. निधी पाण्डेय यांनी निवासी नायब तहसीलदार आर. डी. मेंढे यांना निलंबित केले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, निवासी नायब तहसीलदार मेंढे यांनी दोन्ही रेतीचे टिप्पर सोडल्यामुळे शासनाचे 4 लाख 79 हजार 992 रुपयाचे नुकसान झाल्याचे निलंबन आदेशात नमूद आहे. मेंढे यांचा सदर फाईलशी काहीही संबंध नसतांना त्यांनी फाईल स्वतः जवळ ठेवले होते. तसेच स्पष्टीकरणामध्ये या बाबत त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. या वरुन सदर फाईलमध्ये त्यांचे हितसंबंध असल्याचे स्पष्ट होते, असेही आदेशात म्हटले आहे.

यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रस्तावानुसार, निवासी नायब तहसीलदार रमेश मेंढे यांनी असद्हेतुने वरिल प्रमाणे कृत्य करुन शासनाचे 4,79,992 रुपयाचे एवढ्या महसुलीचे नुकसान केलेले आहे. तसेच पारवा पोलीस स्टेशन येथे रेतीचे दोन टिप्पर डिटेन करुन ठेवलेले असतांना व वाहने सोडुन देण्याचे अधिकार नसतांना मेंढे यांनी वरिष्ठांचे अधिकार वापरून गंभीर स्वरुपाची अनियमितता केलेली आहे.

ज्या अर्थी, निवासी नायब तहसीलदार मेंढे यांनी वरिल प्रमाणे प्रशासकीय कामात गंभीर स्वरुपाची अनियमितता करुन कार्यालयीन शिस्त व सचोटीचे पालन केलेले नाही व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम, 1979 चे नियम 3 (1) (एक) (दोन) (तीन) चा भंग केला आहे.

त्या अर्थी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 4 (1) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून निवासी नायब तहसीलदार मेंढे यांना या आदेशान्वये शासन सेवेतुन तात्काळ निलंबित करण्यात येत आहे, असे निलंबन आदेशात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी निवासी नायब तहसीलदार मेंढे यांना निलंबन आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ठेवण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. मेंढे यांना जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच मेंढे यांचा निलंबन निर्वाह भत्ता जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथून अदा करण्यात येणार आहे.

एकंदरीत निवासी नायब तहसीलदार रमेश मेंढे यांच्या निलंबनाने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

@ घाटंजीचे निवासी नायब तहसीलदार रमेश मेंढे यांची प्रतिक्रिया घेतली असता, माझा या प्रकरणांशी काहीही संबंध नाही. तसेच पोलीस निरीक्षक, पारवा यांना दिनांक 1 जुन 2023 रोजीचे पत्र मी दिलेले नाही. मला या प्रकरणात अंतर्गत राजकारणाचा बळी दिला गेला असुन एक प्रकारे माझ्यावर अन्याय झालेला आहे, असे त्यांनी सांगितले.