Home विदर्भ पावसाने धो-धो धुतले ; विजांच्या तोफांमुळे जीव भांड्यात ९१९ घरे पडली, ११५३.९४...

पावसाने धो-धो धुतले ; विजांच्या तोफांमुळे जीव भांड्यात ९१९ घरे पडली, ११५३.९४ हेक्टरवरील केळी, संत्रा, मुंग, आंबा, भाजीपाला उध्वस्त

163

मनिष गुडधे @ अमरावती : शनिवारच्या रात्री अचानक धो-धो बरसलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्हा जलमय झाला. सलग तासभर सोसाट्याच्या वाऱ्यासह एकामागून एक सलग विजा चमकत होत्या, ठगांचा प्रचंड गडगडाट सुरु होता. त्यामुळे अर्ध्या जिल्ह्याला शनिवारची रात्र चक्क जीव मुठीत धरून काढावी लागली. शनिवारी रात्री जिल्ह्यात एकूण ६० मिलीमीटर इतका म्हणजेच अतिवृष्टी पासून केवळ ५ मिमी कमी इतक्या मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह धो-धो बरसलेल्या या पावसांत ९१९ घरे पडली असून जिल्ह्यात ११५३.९४ हेक्टरवरील केळी, संत्रा, मुंग, आंबा, भाजीपाला, भुईमूग, गहू, कांडा, तीळ, ज्वारी पीक पूर्णतः उध्वस्त होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या या मुसळधार वादळी पावसामुळे व विजेच्या कडकडाटाने अमरावती शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. शहरातील अनेक भागातील झाडे कोसळली. त्यामुळे निम्म्या शहरातला वीज पुरवठा खंडित झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही वॉर्डामध्ये पाणी शिरले. बडनेरा रेल्वे स्थानकातही पाणी साचले होते. शहरातल्या काही घरांचे अंशतः तर काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातल्या राजापेठ व दस्तुर नगर मार्गावर सर्वाधिक वृक्ष व विजेचे खांब कोसळले.

५ जनावरे, १५०० कोंबड्या, २० बकऱ्यांचा मृत्यू
शनिवारी जिल्ह्यात कोसळलेल्या अवकाळी पावसात एकूण ५ मोठी जनावरे, १५०० कोंबड्या व पोहरा येथील अहिल्यादेवी शेळीपालन केंद्र येथील २० बकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती रविवारी जिल्हा प्रशाशनाकडून प्राप्त झाली. या पावसामुळे जिल्ह्यातील अमरावती, मोर्शी, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यातील एकूण ११५३.९४ हेक्टरवरील फळ, भाजीपाला, अन्य धान्य पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली झाली आहे.

रविवारीही रिपरिप ; भर उन्हाळ्यात गारवा
रविवारी सकाळ पासूनच वातावरणात बदल होऊन पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली. दुपारनंतर जोरदार वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा संचारला होता. भर उन्हाचा असलेल्या एप्रिल महिन्यात पाऊस व गारवा अनुभवण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याचे नागरिकांनी सांगितले. आणखी काही दिवस ऊन-सावली, वादळ-वारे, गारपीट-पाऊस हा खेळ सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.