Home यवतमाळ उंदरणी येथील सरपंच भगवान मेश्राम अपात्र..!

उंदरणी येथील सरपंच भगवान मेश्राम अपात्र..!

324

➡️ अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे आदेश.!

( अयनुद्दीन सोलंकी )

घाटंजी : घाटंजी तालुक्यातील उंदरणी येथील सतत वादग्रस्त राहणारी ग्रामपंचायतचे सरपंच भगवान रघुजी मेश्राम यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी एका आदेशान्वये अपात्र घोषीत केले आहे.

घाटंजी तालुक्यातील उंदरणी येथील ग्रामपंचायतचे सरपंच भगवान रघुजी मेश्राम यांचे विरुद्ध ग्रामपंचायत सदस्य अमोल रमेश गावंडे यांनी यवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयात २१ जुन २०२२ रोजी अर्ज दाखल करुन सरपंच भगवान मेश्राम यास अपात्र करण्याची मागणी केली होती.

सदर प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य अमोल गावंडे यांचे वकील अँड. परमेश्वर अडकीने यांनी न्यायालयात बाजु मांडली.

घाटंजी तालुक्यातील उंदरणी येथील गैरअर्जदार सरपंच भगवान रघुजी मेश्राम यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ नुसार अपात्र घोषीत करण्याबाबत अर्ज खालील मुद्द्यावर या अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे न्यायालयात दाखल केल्यावरुन प्रकरण प्रजीबध्द करण्यात करण्यात आले.

तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य अमोल गावंडे हा सन २०१८ मध्ये झालेल्या उंदरणी येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता. गैरअर्जदार सरपंच भगवान रघुजी मेश्राम हा थेट जनतेतून ग्रामपंचायत उंदरणीच्या सरपंचपदी निवड झाली होती.

ग्रामपंचायत सदस्य अमोल गावंडे यांनी ०१ ऑक्टोंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत सचिव पदमाकर दौड यांना माहीतीचा अधिकार कायदा अंतर्गत अर्ज करून माहिती मागितली होती. ग्रामपंचायत सचिव पदमाकर दौड यांनी दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी लिखित स्वरूपात माहिती पुरवली की, सरपंच भगवान रघुजी मेश्राम यांनी माहे सप्टेंबर २०२१ रोजीची मासिक सभा घेतली नाही. वास्तविक पाहता मासिक सभा कोणत्याही पुरेशा कारणाशिवाय शक्य न झाल्यास पुढील तारखेस घेणे अपेक्षीत असते. परंतु सरपंच मेश्राम यांनी माहे सप्टेंबर २०२१ मध्ये ग्रामपंचायत उदरणीची सभा घेतली नाही.

कायद्यातील तरतुदीनुसार, सरपंच यांनी नियमितपणे मासिक बैठक बोलाविणे आणि आयोजित करणे बंधनकारक आहे. परंतु त्यांनी कोणत्याही पुरेशा कारणाशिवाय मासिक सभा घेतली नाही हे सुध्दा कळवले नाही. आणि माहे सप्टेंबर २०२१ या महिन्याची आयोजित बैठक घेतली नाही. त्यामुळे अर्जदार ग्रामपंचायत सदस्य अमोल गावंडे यांनी स्पष्टपणे अपात्रता अर्जीत केलेली असल्यामुळे सरपंच यांना अपात्र करणे बाबत तक्रार दाखल केली.

त्यानुसार उंदरणी येथील ग्रामपंचायतचे सचिव पदमाकर दौड यांनी दिनांक ११ जुलै २०२२ रोजी अपर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात लेखी जबाब दाखल केला. त्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत उदरणी येथील मासिक सभा माहे सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली नाही. सप्टेंबर २०२१ मधील मासिक सभे संदर्भातील उल्लेख ग्रामपंचायतच्या अभिलेख्यात सभेच्या नोटीस बुक मध्ये कामकाज रजिस्टर मध्ये व तसेच हजेरी रजिस्टर मध्ये सभा झाल्याची नोंद दिसून येत नाही, असे नमुद केले.

त्यानुसार सरपंच भगवान मेश्राम यांचे वकील ॲड. अमित बदनोरे यांनी दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सरपंच यांना सदर प्रकरणातील आवश्यक कागदपत्रे पुरविणे बाबत पत्र पाठविले. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की, आपण आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत तर केसमध्ये होणा-या निर्णयास तुम्हीच जबाबदार राहाल.

प्रकरणात वरील प्रमाणे सरपंच भगवान मेश्राम यांचा अर्ज, ग्रामपंचायत सचिव नरेंद्र ठाकरे यांचा लेखी अहवाल व कागदपत्रे दाखल केल्यावरुन उंदरणी येथील सरपंच भगवान रघुजी मेश्राम यांना अपात्र घोषित करण्यात आले. अर्जदार ग्रामपंचायत सदस्य अमोल गावंडे यांची बाजू ॲड. परमेश्वर अडकीने यांनी मांडली. विशेष म्हणजे सदर आदेशामुळे घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये खळबळ माजली आहे.