Home यवतमाळ अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकरी धडकले…!

अतिवृष्टीच्या मदतीसाठी शेतकरी धडकले…!

235

 

गुरुदेव’चे नेतृत्व; कापरा येथील पारध्यांचा प्रश्न तहसील कार्यालय दणाणले…!

यवतमाळ : अतिवृष्टीची मदत अद्याप खात्यात वळती न झाल्याने त्रस्त झालेल्या कापरा येथील पारधी समाजातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक दिली. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन छेडल्या गेले यावर तहसीलदारांनी दहा दिवसाचा वेळ मागितला आहे.
मागासलेपणाचा ज्यांना बट्टा लागला असे पारधी बांधव आपल्या जीवनात बदल घडवू पाहतात यातूनच अनेक पारधी बांधव शेती व्यवसायाकडे वळले. कापरा येथील पारधी बेड्यावरील बहुसंख्य पारधी शेती कसतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.शेती तोट्याची झाली तर त्यांचापुढे अनेक प्रश्न निर्माण होतात.येथील पारधी बांधवांना पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका बसला मात्र पावसाळा संपला आणि दिवाळीही अंधारात गेली तरीदेखील त्यांना ही शासकीय मदत मिळाली नाही. मुख्यमंत्र्यांनी ही मदत जाहीर करून बरेच दिवस उलटून गेले तरीदेखील ते या आर्थिक मदतीपासून वंचित आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते या मदतीची याचना करीत आहे परंतु प्रशासनाकडून त्यांचा हिरमोड होत आहे. त्यांची ही हतबलता लक्षात घेत गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम त्यांना हक्काची मदत मिळवून देण्यासाठी आज त्यांची एकजूट बांधली त्यांचा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर आणला. दरम्यान,तहसीलदारांच्या कक्षापुढे त्यांनी पारधी समाजातील शेतकऱ्यांना घेत ठिय्या मांडला त्यानंतर तहसीलदारांनी दहा दिवसाचा अवधी द्या त्यानंतर पात्र असलेल्या आणि मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल,असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतरच गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष गेडाम यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आंदोलनात गुरुदेव युवा संघाचे भाऊराव वासनिक,मंदा मानकर, प्रफुल मानकर तसेच कापरा येथील वंचित शेतकरी नाजीशेठ घोसले, माकराम घोसले, इललाटरी घोसले, सुगराम घोसले, निमलकट्टी घोसले, रसन्या पवार, श्याम जादूगार, नंदुशेठ घोसले, करणलाल पवार, बंगनाबाई पवार, बतावन पवार, बाबा रंगीला आदींनी सहभाग घेतला.

बॉक्स :
बँकेकडून टोलवाटोलवी
कापरा येथील पारधी बांधवांनी शासकीय मदत जमा झाल्याची खात्री करण्यासाठी आयडीसी,मध्यवर्ती तसेच ग्रामीण बँकेमध्ये चकरा मारल्या परंतु बँक व्यवस्थापनाकडून त्यांची टोलवाटोलवी करण्यात आली. उद्धट उत्तरे देत त्यांना माघारी पाठविल्या गेले. ही बाब अत्यंत वाईट असल्याची प्रतिक्रया गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी दिली.

प्रतिक्रया
अन्यथा तीव्र आंदोलन – गेडाम
कापरा येथील पारधी शेतकरी बांधवांना मिळणारी अतिवृष्टीची मदत ही त्यांच्या हक्काची आहे.
त्यांना ही मदत मिळवून देण्यासाठी पुढे तीव्र आंदोलन उभे करण्याची वेळ आली तर तेही करू. मी प्रशासनानला संविधानिक मार्गाने त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यास प्रशासनाने त्याच पद्धतीने सहकार्य करणे अपेक्षित आहे.