Home यवतमाळ पहिल्याच दिवशी 700 किलो ई-वेस्टची नोंदणी..!

पहिल्याच दिवशी 700 किलो ई-वेस्टची नोंदणी..!

401

 

शैक्षणिक संस्थांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद, जागृत नागरिकांचा सहभाग

यवतमाळ (प्रतिनिधी) : यवतमाळ शहरात पहिल्यांदाच ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) संकलित करण्याची सेवाभावी मोहीम सुरू झाली आहे. याअंतर्गत आज जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त (28 जुलै) जागृत यवतमाळकरांनी 700 किलोपेक्षा जास्त ई-वेस्टची नोंदणी केली. यामध्ये शैक्षणिक संस्थांचा स्वयंस्फूर्त सहभाग होता.


या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी प्रयास यवतमाळ, यवतमाळ प्लॉगर्स जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आज लोहारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रचार, प्रसार, विस्तार केला. शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठान, शासकीय कार्यालय, पतसंस्था आदी ठिकाणी लोकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे आरोग्य आणि पर्यावरण यांचे होणाऱ्या नुकसानीची कल्पना देण्यात आली.
आज शहरातील जाजू स्कुल, वसंतराव नाईक शाळा, श्री बजाज, श्री बनगीनवार, जैन ब्रदर्स, जगदंबा अभियांत्रिकी आदी ठिकाणाहून स्वयंस्फूर्तपणे नोंदणी करण्यात आली. नगर परिषद वाहनतळ येथेही 100 किलोपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा नागरिकांनी जमा केला.
या उपक्रमात 100 किलोपेक्षा जास्त ई-वेस्ट देणार असलेल्यांकडून थेट त्यांचे जागेवर जाऊनच हा ई-कचरा आयोजकांकडून जमा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ई-वेस्ट देणाऱ्या व्यक्ती, संस्था, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, कार्यालय, बँक, व्यापारी प्रतिष्ठान, समूह आदींना 31 जुलैला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
29 आणि 30 जुलै दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत नगर परिषद कार्यालयाच्या वाहनतळ येथे यवतमाळकरांकडून ई-वेस्ट स्वीकारल्या जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, बॅटरीवर चालणारी उपकरणे, संगणक संबंधितचे सर्व साहित्य, टिव्ही, मोबाईल, शीतकरण यंत्रे, सीडी, कॅसेट्स, माहिती तंत्रज्ञान आधारित वस्तू आदी ई-वेस्टमध्ये येतात.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाची नोंदणी व परवानगी असलेल्या संस्था आणि कंपनीच्या मार्फत रीतसर व नियमानुसार या ई-कचऱ्याचे कुठलेही प्रदूषण न होता रिसायकल व वर्गीकरण होणार आहे.
वातावरण, जल, वायू, मातीसह समस्त पर्यावरण दूषित करणारा हा ई-कचरा आरोग्यासही हानिकारक आहे. या घातक कचऱ्याचे उच्चाटन करण्यासाठी सर्व वयोगटातील यवतमाळकरांनी आवर्जून व स्वयंस्फूर्त सहभाग घ्यावा तसेच अधिक माहिती व नोंदणीसाठी 9850316211/8275554452 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.