
➡️ यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र.न.२३५ ने दिला आंदोलनाचा इशारा..?
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी – शिक्षकांचे पगार फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित आहेत. एप्रिल महिना संपत आल्यानंतरही फेब्रुवारी व मार्च महिन्याचा पगार न मिळाल्याने शिक्षक आर्थिक विवंचनेत असून वेळेवर पगार द्यावा या मागणीला पंचायत समिती प्रशासन दाद देत नसून, दोन दोन महिने उशिरा पगार मिळत असल्याने शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिक्षक आर्थिक अडचणीमुळे त्रस्त झाला असून हा त्रास कधी संपणार असा संतप्त सवाल यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र. न. २३५ ने उपस्थित केला आहे.
शिक्षकांचे वेतन रखडल्याने पगार वेळेवर होण्यास काय अडचण आहे, याची यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ र.न. २३५ च्या शिष्टमंडळासह वारंवार पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करून विचारणा केली आहे. मार्च महिन्याच्या वेतनाला विलंब झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
मार्चच्या पगारासाठी जिल्हा स्तरावरून आवंटन प्राप्त झाल्यानंतर वेतन देयकाच्या प्रवासाला किती अवधी लागणार याबाबत अनिश्चितता आहे. तो पर्यंत शिक्षकांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे. शिक्षकांच्या वेतनात कायमच अडचणींचा डोंगर उभा राहत असल्याने शिक्षकांचे वेतन कायम उशिरा देण्यात येते. दरमहा १५ तारखेपर्यंत शाळांकडून पगाराचे देयक पंचायत समितीकडे पोहोचते. हे देयक शालार्थमध्ये तयार होऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवले जाते. तसेच त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसोबत दिली जाते. यानंतर याची वित्त विभागाकडून तपासणी करून देयक मंजूर होते. कोषागारातून कधी शाईची प्रत, निधीचा अभाव तर कधी ताळमेळ न जुळाल्याने पगारास दिरंगाई होऊन वेळेवर पगार होत नाही. ही पद्धत किती दिवस चालणार असा सवाल यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ. र. न. २३५ ने उपस्थित केला असून मार्च व एप्रिल महिन्याचा पगार रमजान ईद या सनापूर्वी व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून विलंब होत असल्यास महाराष्ट्र दिनी घाटंजी पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा इशारा, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पुसनाके, सचिव अमोल चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष गौतम कांबळे, जिल्हा समन्वयक काशीनाथ आडे, जिल्हा कोषाध्यक्ष विजय डंभारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवि आडे, जिल्हा प्रतिनिधी अविनाश खरतडे आदींनी दिला आहे.











































