
…अन्यथा सोमवारपासून आमरण उपोषण

आर्णी/यवतमाळ – नुकतेच स्व. किसनराव इंगळे सार्वजनिक वाचनालय आर्णी व यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघाचे ३९ वे वार्षिक अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे यांनी उपस्थिती न लावल्याने जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करा, अन्यथा सोमवारपासून (दि. २१) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य प्रल्हादराव इंगळे यांनी दिला आहे.
दरवर्षी यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघामार्फत वार्षिक अधिवेशन घेऊन यात जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांतील कर्मचारी यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच त्यांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा ग्रंथपाल/ ग्रंथालय अधिकारी यांचेसह वरीष्ठ अधिकारी देखील हजेरी लावतात. परंतु यावर्षीच्या वार्षिक अधिवेशनात जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे यांनी हजेरी न लावल्याने जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य प्रल्हादराव इंगळे यांनी ग्रंथालय संचालक व सहाय्यक ग्रंथालय संचालक यांचेकडे तक्रार दाखल करून जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करा, अशी मागणी केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास सोमवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रल्हादराव इंगळे यांनी दिला आहे.
त्यामुळे त्यांच्या या तक्रारीवर ग्रंथालय संचालक व सहाय्यक ग्रंथालय संचालक काय कार्यवाही करतात, याकडे लक्ष लागले आहे.











































