Home रायगड जुन्या रितीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल

जुन्या रितीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल

175

ज्यांचे पती हयात नाहीत अशा माता भगिनींना हळदी कुंकवाचा सुवासिनीचा मान , रायगड जिल्हा स्वकुळ साळी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम….

रघुनाथ भागवत
महाड , दि. २७ :- विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात ज्यांचे पती हयात नाहीत अशा माता भगिनींना बाजूला ठेवण्याच्या जुन्या रितीरिवाजाला फाटा देत नलिनी दौडे विद्यालय मुलुंड, ठाणे येथे भगवान श्री जिव्हेश्वर आणि माता अंकिनी, दशांकिनी विवाह सोहळा व मकर संक्रांत मेळावा कार्यक्रमाचे औचित्य साधून संक्रांतीचे वाण देऊन या महिलांना सुवासिनीचा मान देण्यात आला. रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबई आणि रायगड जिल्हा महिला मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमाद्वारे जुन्या चालीरितींना मूठमाती देण्यात आली. ज्यांचे पती हयात नाहीत अशा माता भगिनींना हळदी कुंकवाचा सुवासिनीचा मान देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मुंबईस्थित महिलांनी सहभागी होत सामाजिक बदलाच्या दिशेने हे नवे व प्रेरणादायी पाऊल टाकले.
लग्नानंतर नियतीने हिरावून घेतलेले सौभाग्याचे लेणे आणि पती निधनानंतर विधवा म्हणून समाजाकडून मिळणारी वागणूक अनुभवून ज्यांचे पती हयात नाहीत अशा माता भगिनींनी यावेळी मंडळाच्या उपक्रमा विषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर अशा महिलांना सन्मान देण्याचे कार्य मंडळाच्या वतीने हाती घेतले आहे. गेली चार वर्षांपासून त्या अनिष्ठ रुढी-परंपरा बाजूला ठेवत ज्यांचे पती हयात नाहीत अशा माता भगिनींचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न महिला मंडळाच्या वतीने होत असल्याचे सांगून या कार्यक्रमाचा अन्य सामाजिक मंडळांनी प्रेरणा घेऊन आपल्या स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, असे यावेळी प्रमुख अतिथी ठाणे जिल्हा स्वकुळ साळी समाज महिला मंडळ अध्यक्षा वैशाली कढेकर यांनी व्यक्त केले, तर अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज अध्यक्षा अश्विनी मते यांनी देखील विशेष कौतुक करून भरभरून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

धार्मिक कार्यक्रमात ज्यांचे पती हयात नाहीत अशा माता भगिनींना प्रवेश दिला जात नाही. सामान्यपणे जगणे या महिलांचे नाकारले जाते. तसेच मकरसंक्रांतीला सर्वत्र हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमात महिला सुवासिनीदेखील प्रथेनुसार अशा महिलांना टाळतात, ही प्रथा बंद व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित समाज भगिनींनी विशेष सहयोग देऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी भगवान श्री जिव्हेश्वर आणि माता अंकिता, दशांकिनी विवाह सोहळा देखील सर्वांच्या सहयोगाने उत्साहात संपन्न झाला, यावेळी मंडळाचे अध्यक्ष अविनाश साळी, अजित साळी, महिला मंडळ अध्यक्षा श्वेता आंबूर्ले, कार्याध्यक्षा कल्पना शिपुरकर आणि दोन्ही कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य व महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी साजरा केला.