
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी / यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व सामाजिक शांतता प्रस्थापित व्हावी या करीता जिल्हाधिकारी 144 कलमातंर्गत जमाव बंदी आदेश काढू शकतात. जमाव बंदी आदेशानुसार पाच जणांच्या वर नागरिकांना एकत्र जमता येत नाही. पण सध्या कोणते धार्मिक उत्सव नाही. तरी lockdown ची भीती आणि अनावश्यक निर्बंधांमुळे एक डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत जमाव बंदी आदेश काढून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. तसेच या परिस्थितीचा फायदा घेऊन व्यापारी शेतीमालाचे बाजार भाव पाडत आहे, असा आरोप शेतकरी नेते मोरेश्वर वातीले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे. शेतकरी सध्या प्रचंड संकटात सापडला आहे. घाटंजी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारने अतिवृष्टीची मदत म्हणून सरसकट हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात मात्र मदत देतांना शेतकऱ्यांंचे पैसे कापण्यात आले. कुर्ली, आणि पारवा मंडळ हे चक्क सोडून देण्यात आले आहे. शिवणी मंडळातील शेतकऱ्यांना अर्धे राक्कम देण्यात आली आहे. अतिवृष्टी एवढी भयंकर होती की, शेतकऱ्यांचा खरिपाचा हंगाम मातीमोल झाला आहे. या भिषण परिस्थिती मध्ये मात्र आणेवारी 53 टक्के काढल्या गेली आहे. आणेवारी काढण्याच्या कोणत्या पद्धती अस्तित्वात आहे, हे मात्र शेतकऱ्यांना अद्यापही माहित नाही. अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे. आज शेतकऱ्यांजवळ जो काही शेतमाल आहे तो विक्री करण्याचे दिवस आहे. शेतमाल विक्री करतांना या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. नेमका हरभरा, गहू पेरल्यानंतर विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस अथवा सुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापत आहे. हे अतिशय दुर्भाग्यपुर्ण आहे, असे ही या वेळी मोरेश्वर वातीले यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी एकत्र येऊ नये, जिल्ह्यात कुठे मोर्चे, आंदोलने होऊ नये या करिता पांच जणांच्या व्यतिरिक्त नागरिकांना एकत्र येता येणार नाही, असा आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढणे म्हणजे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होय अशे म्हणायला हरकत नाही, असे ही वातीले यांनी म्हटले आहे. या बाबत शासनाच्या वतीने गांभीर्याने विचार व्हावा, विज वितरण कंपनी कडून कापल्या गेलेले विज कनेक्शन तात्काळ जोडून देण्यात यावे व पुढेही विज कनेक्शन कापण्यात येऊ नये, नाही तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले की, या सुडाच्या कार्यवाहीला पुन्हा वेग येईल. मात्र या कार्यवाही मुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच पिक विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई मिळावी, अतिवृष्टीच्या मदती पासून सुटलेल्या गावांना आर्थिक मदत द्यावी व विनाकारण जिल्ह्यात प्रशासनाने आणिबाणी सारखी परिस्थिती निर्माण करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, नाही तर जमाव बंदीच्या आदेशा नंतरही शेतकरी रस्त्यावर येतील, असा इशारा शेतकरी नेते मोरेश्वर वातीले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.










































