Home मराठवाडा सुखात भगवंताची आठवण केल्यास दुःख येणार नाही- हभप ज्ञानेश्वर माऊली

सुखात भगवंताची आठवण केल्यास दुःख येणार नाही- हभप ज्ञानेश्वर माऊली

344

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

दुःख आले कि आपण भगवंताचा धावा करत असतो. दुःखात देवी, देवतांची सर्वच आठवण करतात.सुखात नाही.सुखात भगवंताची आठवण केल्यास दुःख येणारच नाही असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी केले.

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन मालेच्या श्रृखलेत चौथ्या दिवशी माऊली महाराज यांचे जबरदस्त किर्तन झाले.जीवनातील विविध पैलूंवर श्रोत्यांना खिळवत ठेवत परिस्थिती नव्हे तर स्वस्थितीची जाणीव करून दिली.महाराज म्हणाले की जो धर्माचे आचरण करतो तो सुशिक्षित समजावा.पैसा सोडला तर जगात कुणीही प्रेम करत नाही.श्रीमंतीचा आणि सुखाचा अजिबात संबंध नाही.खरे सुख परमात्म्याच्या सतत आठवणीत आहे.संसारात कितीही धडपड केली तरी संसार सोबत येत नाही.अंत:करणात निष्ठा असली पाहिजे.जगतगुरू तुकोबाराय यांच्या ‘ निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म..’ या तीन चरणांच्या अभंगावर निष्ठावंत भाव दर्शविणाऱ्या अभंगांचे निरूपण केले.महाराज म्हणाले, संसारात धडपड करून सुविधा मिळवू शकतात परंतु समाधान नाही. अंतःकरणात निष्ठाभाव असला पाहिजे हे पटवून देताना महाराजांनी विविध दृष्टांत देऊन पटवून दिले.आपली भारतीय संस्कृती उज्ज्वल आहे परंतु काळाच्या ओघात त्यामध्ये बदल होत असल्याची खंत व्यक्त केली.उपस्थित श्रोतेगणातील पुरूष, महिला आणि तरूणांना उपदेश देताना महाराज म्हणाले, ‘तारूण्य हे परमार्थाने शोभून दिसत असतं ‘ हरिनाम सप्ताहातील विचार आचरणात आणले पाहिजेत.समाज परिवर्तन झाले तरच हरिनाम सप्ताहाचे महत्व राहते.