
मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट, दि : २४ :- किनवट तालुक्यातील उमरी बाजार जिल्हा परिषद सर्कल मधील गोरगरीब जनतेच्या लेकींसाठी आनंदाची बातमी ” माझी लेक माझा अभिमान ” हा उपक्रम राबवित सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत एक हजार लेकींचे खाते उघडून पाहिला हप्ता भरणा करण्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यात प्रथमच उमरी बाजार येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनयना विशाल जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस किनवट विधानसभा अध्यक्ष विशाल जाधव या दांपत्त्यांनी हाती घेतला असुन, उमरी बाजार जिल्हा परिषद गटातील गोरगरीब जनतेनी ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा! आणि आपल्या काळजाच्या तुकड्याची काळजी करायला नको का? अर्थातच, यासाठीच भारत सरकारच्या “लेक जगवा, लेक शिकवा” ह्या संकल्पातून साकारलेली सुकन्या समृद्धी योजना हा उत्तम पर्याय आहे. म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनयना विशाल जाधव व विशाल जाधव या दांपत्यांनी उमरी बाजार जिल्हा परिषद गटातील गोरगरीब जनतेच्या लेकीसाठी एक हजार खाते उघडून पाहिला हप्ता भरणा करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेऊन समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – मुलीचा आधार कार्ड किंवा जन्म दाखला, दोन पासपोर्ट फोटो, वडीलांचे आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटो, असे असून उमरी बाजार जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील, सर्व सुज्ञ प्रतिष्ठित नागरिक आणि युवा मित्रांनी याबाबत आपल्या गावातील गरजू गरीब कुटुंबियांच्या लेकीसाठी मला संपर्क करावे असे आवाहन विशाल जाधव यांनी केले आहे.











































