
पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर यांचे प्रतिपादन
परीसंवाद: ‘पोलीस विभाग आणि मुंबई पोलीसांची कार्यरचना’
अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे यशस्वी आयोजन
यवतमाळ – माणुस हा समाजशील प्राणी आहे. त्याला नेहमी समाजामध्ये मिळून मिसळून गुण्यागोविंदाने रहायला आवडते. मात्र समाजातील काही अपप्रवृत्तीचे लोक समाजातील शांतता भंग करण्यासाठी कायम सरसावलेले असतात. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपला पोलीस विभाग सदैव दक्ष असून सुजाण नागरीकांनीही आपली जबाबदारी ओळखुन पोलीसांना वेळोवेळी सहकार्य करावे, असे प्रतिपादन भायकळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर यांनी केले.
नुकतेच दि. २८ रोजी स्थानिक विद्या प्रसारक मंडळद्वारा संचालित अमोलकचंद विधी महाविद्यालयात ‘पोलीस विभाग आणि मुंबई पोलीसांची कार्यरचना’ या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन परीसंवादात त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना पोलीसांचे कार्यक्षेत्र, जबाबदारी, पोलीस स्टेशन, एफआयआर, पंचनामा, स्टेशन डायरी, गंभीर गुन्ह्यांचा छडा, चार्जशीट, प्रकरण न्यायालयात दाखल करणे, आरोपींची पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी आदी महत्वपूर्ण बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरेही दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुप्रभा यादगिरवार होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे प्रभारी प्रा. डॉ. संदीप नगराळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीसंवाद समन्वयक प्रा. डॉ. विजेश मुनोत, प्रा. स्वप्नील सगणे, प्रा. वैशाली फाळे, प्रा. छाया पोटे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा.वंदना पसारी, आदींनी अथक परीश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन हजेरी लावली होती.
चौकटचा मजकुर
“समाज हेच कुटुंब समजुन शासकीय कर्तव्याची अथक पुर्तता”
परीसंवादाला मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर यांनी “वैयक्तीक कुटुंबाप्रमाणेच समाज हेच आपले कुटुंब आहे असे समजुन प्रत्येक पोलीस आपले शासकीय कर्तव्य पार पाडत आहे. आपल्या कुटुंबाला, मुलाबाळांना पाहिजे तितका वेळ वेळ देता येत नाही, याची खंत देखील वाटते, मात्र त्यामुळेच सर्वसामान्य नागरीक आपल्या घरात आपल्या जीवलग कुटुंबियांसोबत मनमोकळेपणाने श्वास घेऊ शकतात, याचा आम्हाला अधिक अभिमान वाटतो”, असे भावनिक प्रतिपादन त्यांनी केले.










































