Home विदर्भ यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचा वादग्रस्त एककल्ली कारभार चव्हाट्यावर

यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचा वादग्रस्त एककल्ली कारभार चव्हाट्यावर

397

नवनियुक्त कार्यकारीणी अवैध असल्याचा सामाजिक कार्यकर्ते सुरज नेताजी किनाके यांचा आरोप

मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे मागितली दाद

 यवतमाळ – जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे शासनदरबारी प्रतिनिधीत्व करणारी संघटना असलेल्या यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाची नुकतीच सन २०२० ते २०२३ या कालावधीकरीता निवडणुक झाली. या निवडणुकीत संघाचा वादग्रस्त एककल्ली कारभार पुन्हा एकदा समोर आला. संस्थेच्या घटना, नियम व नियमावलीच्या तरतुदीला दुर सारुन आपल्या सोईप्रमाणे हि निवडणूक पार पाडल्याने संघाची नवनियुक्त कार्यकारीणी अवैध असल्याचा आरोप करुन युवा सामाजिक कार्यकर्ते सुरज किनाके यांनी दि. २ जुलै रोजी मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करुन दाद मागितली आहे.

यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाच्या घटना तथा नियम व नियमावलीप्रमाणे कार्यकारी मंडळाचे २१ सदस्यांपैकी १० सदस्य संस्था सभासदांतून, ६ सदस्य व्यक्ती सभासदांतून तर ५ सदस्य (पैकी २ महिला) सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी सभासदांकडून निवडले जातात. यापैकी ‘व्यक्ती’ सभासद गटाकरीता निवडून द्यावयाच्या ६ जागेकरीता मतदार असलेल्या सभासदांपैकी केवळ २ अर्ज सादर झाले, उर्वरीत ४ सदस्यांची या गटाचे मतदार नसतानाही मनमर्जीने निवड करण्यात आली. सोबतच ‘सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी’ या मतदार संघातून निवडून जाणा-या ५ सदस्यांपैकी २ महिला सदस्य असणे आवश्यक असतानाही केवळ एकच महिला ग्रंथपाल सुजाता शेंडे यांचा अर्ज स्विकारुन उर्वरीत ४ जागेवर पुरुष सदस्याची निवड या नवनियुक्त कार्यकारीणीत करण्यात आली. असे असतानाही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कोणताही आक्षेप न घेता या गटाकरीता केवळ १ महिला सदस्याचे नामांकन स्विकारून इतर ४ पुरुष सदस्यांचे नामांकन स्विकारुन त्यांची सदस्यपदी केलेली निवड पूर्णपणे अवैध व संस्थेची घटना तथा नियम व नियमावलीचे उल्लंघन करणारी आहे, असा आरोप सुरज किनाके यांनी आपल्या तक्रारीतुन केला आहे.

त्यामुळे जिल्ह्याच्या सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला मोठा हादरा बसला आहे, हे नक्की. आता याप्रकरणी न्यायालय काय आदेश पारीत करते, याकडे जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे लक्ष लागले आहे.