
सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून आवळल्या मुसक्या
पोलीसवाला प्रतिनिधी / ८ जुलै
औरंंगाबाद : खरेदी, विक्री केलेल्या जमीनीबाबत तलाठी कार्यालयात आक्षेप नोंदवत बांधकाम व्यवसायीकाला १५ लाखांची खंडणी मागणाऱ्याला गुरुवारी (दि.८) दुपारी सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. जद्दी मीर फकर अली जफर अली (वय ५५, रा. एसआरटी नं. ११८, लेबर कॉलनी) असे खंडणी मागणीकणाऱ्याचे नाव आहे.
शेख मोहम्मद साबीर शेख मोहम्मद शरीफ (वय ४०, रा. आरेफ कॉलनी) यांचा बॉम्बे बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स आणि बॉम्बे ग्लास हाऊसचा व्यवसाय आहे. शेख मोहम्मद साबीर यांचे जमीन खरेदी विक्रीच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक, तलाठी कार्यालयात नेहमी जाणे येणे असते. ११ डिसेंबर २०१९ रोजी शेख मोहम्मद साबीर यांनी शहरातील गट क्रं. १०७ मधील २० गुंठे जमीन कडुबाई लाटे यांच्याकडून खरेदी केली. व त्या जमीनीवर शेख मोहम्मद साबीर यांनी प्लॉटींग टाकून त्याची विक्री सुरु केली. १० जून रोजी फिर्यादी हे गट क्रं. १०७ मधील विक्री केलेल्या प्लॉटच्या फेर संबंधी गेले असता तलाठींनी सदरील जमीनीच्या खरेदी व विक्री बाबत जद्दी मीर फकर याने आक्षेप नोंदविल्याने जमीनीचा फेर देता येणार नसल्याचे सांगितले. व जद्दी मीर याच्याशी संपर्क करण्यास सांगितीले.
शेख मोहम्मद साबीर यांनी जद्दी मीर याच्याशी संपक साधला असता जद्दी मीर याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ बोलावले. त्यावेळी शेख मोहम्मद साबीर यांनी आक्षेप नोंदविण्याबाबत विचारले असता जद्दी मीर याने मी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही, तुम्ही मला दोन प्लॉट द्या किंवा १५ लाख रूपये द्या, नसता तुमचे जमीन खरेदी-विक्रीचे काम होवू देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यामुळे शेख मोहम्मद साबीर यांनी सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.











































