
मजहर शेख, नांदेड
नांदेड , दि. १५ :- नांदेड परिक्षेत्रात विशेष पोलीस उप महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र आयपीएस निसार तांबोळी यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने अनेकांनी आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. परंतु ही बातमी जुनी असून मला तीन वर्षांपूर्वीच राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदरील बातमी ही जुनी असल्याने ही बातमी कुणीही सोशल मीडियाद्वारे प्रसारीत करू नये असे आवाहन त्यांनी जनतेस केले आहे.
आयपीएस निसार तांबोळी हे 1996 पासून सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले लातूर जिल्ह्यातील अधिकारी आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण केल्या असून कुठल्याही वादविवादात ना अडकलेले ते एकमेव अधिकारी आहेत, हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, अमरावती, नाशिक, मुंबई येथे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. 2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत होते,2008 ते 2009 एअरपोर्ट झोन,2015 ते 2017 औरंगाबाद येथे सीआरपीएफ मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे.त्यांना यापूर्वी सीआरपीएफ औरंगाबादचा परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे. 3 वर्षांपूर्वीच त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. परंतु ही जुनी बातमी सोशल मीडियावर नव्याने मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून फेसबुक, व्हाट्सअप, विविध न्युज पोर्टलवर व कांही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याने अनेकांनी आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांचे सोशल मीडियावर मॅसेजद्वारे व शुभेच्छा पोस्ट टाकून अभिनंदन केले आहे.











































