
बोदवड : बोदवड पोलिस ठाण्यात पत्रकार गोपाल व्यास यांना दमदाटी करत पोलिस ठाण्यात आल्यास पाहून घेईल, असा दम देणाऱ्या निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी एक दिवसी काळ्या फिती लावून तहसीलदार कार्यलयासमोर पत्रकार संघाकडून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनस्थळी खासदार रक्षा खडसे यांनी भेट देत पत्रकारांसोबत अशी वागणूक करणाऱ्या पोलिस निरीक्षकांचे कृत्य लोकशाहीला हानिकारक असून या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कारवाई करण्याचे पत्र देणार असल्याचे त्या म्हणाल्या. आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील येत्या दहा दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांना दिले. मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट देत चौकशी करून अहवाल देणार असून कारवाईचे आश्वासन दिले. कारवाईच्या आश्वासनाने आंदोलन मागे तहसीलदार प्रथमेश घोलप यांना निवेदन देत सदर धरणे आंदोलन कारवाईच्या आश्वासनाने तूर्त मागे घेण्यात आले. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी येत्या काही दिवसात दखल न घेतल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण सपकाळे यांनी दिला आहे. आंदोलनात महेंद्र पाटील, पुरुषोत्तम गड्डम, नाना पाटील, गोपीचंद सुरवाडे, गणेश पाटील, विनोद शिंदे, अर्जुन आसने, नितीन चव्हाण, जितेंद्र गायकवाड, अमोल व्यवहारे, विकास पाटील, राजेंद्र शेळके, सुरेश कोळी, नंदलाल पठे, जाफर मण्यार, तेलंग व बारा बलुतेदार संघाचे रवींद्र बावस्कर, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष लालसिंग पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.











































