Home महत्वाची बातमी बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या विरोधात जितेंद्र कायस्थ यांचे उपोषण

बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या विरोधात जितेंद्र कायस्थ यांचे उपोषण

423

भ्रष्ट अधिका-यांची चौकशी तसेच कर्जप्रकरणी हेराफेरीची चौकशी करण्याची मागणी

अमीन शाह

बुलडाणा – आशिया खंडातील सर्वांत मोठी पतसंस्था असे बिरुद मिरवणा-या बुलडाणा अर्बन पतसंस्थेत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची, तसेच घोटाळे करून धनदांडगे झालेल्यांची चौकशी करावी, बनावट कर्ज प्रकरण करणा-यांच्या विरोधात कारवाई करावी, तसेच स्वतःच्या कर्जप्रकरणात केलेल्या हेराफेरीची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी सिटी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ यांनी सोमवार 17 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयासमोरच सुरू झालेल्या या उपोषणामुळे बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, हे प्रकरण आता निस्तरायचे कसे, या प्रचंड पेचात बुलडाणा अर्बनचे प्रशासन दिसून येत आहे.
जितेंद्र कायस्थ यांनी मागील वर्षी बुलडाणा अर्बन पतसंस्थेतील गैरव्यवहारांची चौकशी करावी, बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे स्पेशल ऑडिट करण्यात यावे, कर्मचा-यांना योग्य तो न्याय मिळावा, पतसंस्थेत प्रचंड घोटाळे करून स्वतःची कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती बनवणा-या महाभ्रष्ट अधिका-यांची चौकशी करावी या मागणीसाठी उपोषण केले होते. या उपोषणादरम्यान कायस्थ यांच्यावर दबाव आणण्यासाठी बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे प्रशासन तसेच पतसंस्थेतील महाभ्रष्ट महाभाग यांनी एक बनावट कर्जप्रकरण तयार केले. तसेच हे 25 लाख रुपयांचे कर्ज न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस कायस्थ यांना दिली. यावरून हे दिसून येते की जो कोणी बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या घोटाळ्यांवर आवाज उठवतो, त्याला अशाप्रकारे नाहक त्रास दिला जातो. यानंतर कायस्थ यांनी या प्रकरणी लढा सुरू केला. त्यानंतर हे प्रकरण बुलडाणा अर्बन प्रशासनाने लवाद न्यायाधिकरणात प्रवीष्ट केले. त्या ठिकाणी सुनावणी होऊन हे प्रकरण लवादाने निरस्त केले. यावरून हे संपूर्ण कर्जप्रकरण बनावट असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. याशिवाय कायस्थ यांनी पतसंस्थेत जे कर्जप्रकरण केले होते, त्यामध्ये देखील हजारो रुपयांचा घपला करण्यात आला आहे. जेव्हढी रक्कम कायस्थ यांनी भरली, त्यापेक्षा कमी रक्कम कर्जात दाखवून उर्वरित रकमेचा घोटाळा करण्यात आला. या एका प्रकरणावरून दिसून येते की, बुलडाणा अर्बन पतसंस्थेत किती प्रचंड प्रमाणात घोटाळे सुरू आहेत.

याशिवाय बुलडाणा अर्बन पतसंस्थेत गेल्या 20 ते 25 वर्षांत नोकरी न करता दलाली करणा-या भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी, ही मागणी सातत्याने कायस्थ यांनी केली. मात्र त्यांच्या या मागणीकडे बुलडाणा अर्बनच्या प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केले. यावरून संचालक आणि या भ्रष्ट अधिका-यांमध्ये अर्थपूर्ण संबंध असल्याचे दिसून येते.
या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जितेंद्र कायस्थ यांनी बुलडाणा अर्बन पतसंस्थेसमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच पतसंस्थेतील सर्व घोटाळे, भानगडी आता चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता हेरून बुलडाणा अर्बन प्रशासनाला चांगलाच घाम फुटला असून, आता या प्रकरणी काय तोडगा काढायचा, हेही त्यांना सुचत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आता बुलडाणा अर्बन प्रशासन कशाप्रकारे कार्यवाही करते, तसेच दोषींवर कशाप्रकारे कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या उपोषणामुळे बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या उत्तम प्रशासनाच्या दाव्याचा बुरखा टराटरा फाटल्याचे दिसून येत आहे, तसेच प्रशासनाचे टायर पंक्चर झाल्याचे दिसून येत आहे.
———————-