Home जळगाव पिसाळलेले कुत्रे चावलेल्या पेशंटला कोणते हॉस्पिटल घेईना

पिसाळलेले कुत्रे चावलेल्या पेशंटला कोणते हॉस्पिटल घेईना

122

-जळगाव शहरातील धक्कादायक परिस्थिती

-हॉस्पिटल्स सुरू असल्याचा दावा करणारे कुठे आहेत

जळगाव- एजाज़ शाह दि.१३जुलै
सध्या कोरोनामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य आजारातील पेशंटची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासन मात्र या तक्रारीचा वेळोवेळी इन्कार करीत आलेला आहे. परंतु आज पिसाळलेले कुत्रे चावलेल्या पेशंटवर सकाळी 11 वाजेपासून हॉस्पिटलमध्ये फिरण्याची वेळ आली आहे. एकही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटल या पेशंटला घेण्यास तयार नसल्याचे विदारक परिस्थिती जळगाव शहरात आहे.

जळगावातील हरीविठ्ठल नगर जवळील कोठारी नगरात राहणारे अशोक भिका वाणी (वय 55 वर्षे) व्यक्तीला पिसाळलेले कुत्रे चावले. सदर व्यक्ती घराबाहेर बसलेला असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर एकदम हल्ला केला. या हल्ल्यात श्री वाणी यांच्या तोंडाचा डावा भागाचा पूर्णपणे कुत्र्याने लचका तोडला. तर दुसर्‍या एका जणाच्या पायावर चावा घेऊन त्याचाही लचका तोडला आहे. यामुळे रक्तबंबाळ झालेले श्री.वाणी यांनी सकाळीच जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. मात्र तेथेही त्यांना घेण्यात आले नाही. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये त्यांनी उपचार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास होकार दिला नसल्याची धक्कादायक परिस्थिती आज जळगाव शहरात आहे. अशा विवंचनेत या पेशंटने जावे कुणाकडे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

लॉकडाऊन लागल्यानंतर हॉस्पिटल बंद होते, मात्र आता हॉस्पिटल सुरू असल्याचा दावा प्रशासन व वेळोवेळी करीत आले आहे. मात्र पेशंटवर उपचार होत नसल्याची धक्कादायक बाब वेळोवेळी निदर्शनास आलेली आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष घालण्यास तयार नाही. नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.