Home विदर्भ वन्य प्राण्यांमुळे तळेगांव परिसरात शेतकरी असुरक्षित

वन्य प्राण्यांमुळे तळेगांव परिसरात शेतकरी असुरक्षित

140

रानडुकरांची शेतातील कोवळ्या पिकांची नासधुस

वर्धा / तळेगांव (शा.पं.) :- मानवाप्रमाणेच इतरही पशुपक्षांना जिवन जगण्याचा अधिकार आहे. यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण फायदा करुन अंमलात आणला. यामुळे जंगलातील प्रत्येक जिवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. मात्र हा कायदा आता शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून शेत शिवारात शेतकऱ्यांंना जाणे कठिण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार डोळ्यादेखत होत असूनही कायद्याने शेतकरी हतबल ठरत आहे.
पेरणीपासून तर पिक हातात येईपर्यंत तळेगांव परिसरातील काहि माैजातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करुन संवर्धन करतात. यासाठी त्याला महिण्याकाठी हजारो रुपये खर्च येतो. मात्र वन्यप्राण्याच्या उपद्रवाला शेतकरी रोखण्यास असर्मथ ठरत आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे.
शेतीचा कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी, रानडुकरांच्या टोळ्या शेतात घुसून कोवळी रोपे उपटून खातात. थोडीही नजरचूक झाली तरीही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण शेतातील पिक ओरबडतात. हा प्रकार नित्यनेमाचा असल्याने शेतकरी हताश होत आहे.
रानडुकरांचा प्रताप याहूनही भयानक आहे. निर्ढावलेले रानडुकरे पिक तुडवून शेताच्या धुऱ्याबांधाची सुद्धा नासधुस करतात. शेताभोवती काटेरी तारेचे कुंपण केले तरीही त्याला न जुमानता शेतात मुसंडी मारतात. सुरुवातीला फटाक्याच्या आवाजाने रानडुकरे पळून जात होती. मात्र आता हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाल्याने डुकरे सरळ शेतात घुसून पिकांची प्रचंड हाणी करीत आहे. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट चाल करुन शेतकऱ्यांवर हल्ला करुन जमखी करीत आहे. दरवर्षी या घटनात वाढ होत आहे. अशावेळी जिवाच्या भितीने शेतकरी शेतीची राखण सोडून घरी राहणे पसंत करीत आहे. यामुळे मात्र रानडुकरांना पूर्ण शेत मोकळे मिळत आहे.
वन्यप्राणी शेतीचे नुकसान करीत आहेत. तर दुसरीकडे जंगलात दबा धरुन बसलेली हिंस्त्र पशू शेताच्या कडेने चरत असलेल्या गाई, म्हशी, बैल, शेळ्यांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हल्ला चढवून ठार करीत आहेत.
कायदा असल्याने शेतकरी काहीही करु शकत नसून मदतीसाठी केवळ वनाधिकाऱ्यांची मनधरणी करीत आहे. मात्र अधिकाऱी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. केवळ मोठ्या घटना घटल्या तर अधिकारी घटनास्थळावर येतात. लहानसहान घटनांकडे ते लक्षही देत नाही.
वनविभाग देत असलेल्या तुंटपूंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो . या घातक कायद्यात आता बदल करुन शेतकऱ्यांनाही संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. सध्या शेतामध्ये निघालेले पिक कोवळे आहेत. शेतात रानडुक्कर धुमाकुळ घालत असल्याने पिक नष्ट होत आहेत. आधीच निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.

रविंद्र साखरे सह इकबाल शेख

9890777242 / 9834453404