Home मराठवाडा शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ५० हजाराचे पॅकेज शासनाने बँक खात्यात जमा करावे – ...

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ५० हजाराचे पॅकेज शासनाने बँक खात्यात जमा करावे –  अॅड.विलास खरात

181

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – बँकांचे कर्ज नियमितपणे इमाने इतबारे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होवू नये म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रूपयांचे पॅकेज जाहीर केले होते.मात्र शासनाने अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर सदरची रक्कम जमा केली नाही.शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ही रक्कम तातडीने देण्यात यावी,अशी मागणी भाजप नेते तथा माजी आमदार अॅड.विलास खरात यांनी केली आहे. या संदर्भात जालना जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अॅड. खरात यांनी म्हटले आहे की, कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्ज माफीची योजना करून ती अंमलात देखील आणली.याच वेळी जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात , त्यांच्यावर अन्याय होवू नये म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पन्नास हजार रूपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. या घोषणेला अनेक महिने उलटूनही शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रूपयांचे पॅकेज त्यांच्या खात्यावर जमा केले नाही. सध्या कोरोनाची पसरलेली साथ आणि तोंडावर आलेला खरिप हंगाम पेरणीपूर्वी शेती मशागत आणि बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. शासनाने या बाबतीत त्वरित दखल घेऊन नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जाहीर करण्यात आलेली पन्नास हजार रूपयांची रक्कम टाकावी यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.