Home विदर्भ कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अधिक सजगपणे काम करावे – जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अधिक सजगपणे काम करावे – जिल्हाधिकारी

98

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

व्हिडीओ कॉन्फरसदवारे जिल्हयातील अधिका-यांची घेतली बैठक

वर्धा , दि. 14 :- इतर जिल्हा, राज्यात अडकलेल्या लोकांच्या येण्यामुळे आपल्या जिल्हयात कोरोनाचा उद्रेक होऊ नये. कोरोनाबाधित सापडल्यास परिस्थिती आटोक्यात आणणे कठीण होते. त्यामुळे आपण दोन महिन्यांपासुन राबवत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक सजगपणे राबविल्यास पुढील कठिण परिस्थिती टाळता येईल. या काळात सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आज आपत्ती व्यवस्थपनात काम करणा-या प्रमुख विभागांना व अधिका-यांना दिल्यात.
जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातुन आठही तालुक्यातील अधिका-यांशी व्हीडीओ कॉन्फरंसव्दारे बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे,निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या सोबतच श्री तेली आणि श्री ओंबासे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी यांनी इत्यंभुत आढावा घेताना सर्वात जास्त भर बाहेर जिल्हा राज्यातुन येणा-या व्यक्तींना होम क्वारंटीन करण्याच्या बाबीवर दिला. सुमारे ४ हजार लोक गेल्या ४ दिवसात जिल्हयात दाखल झाले आहेत. तसेच यापुढेही येत राहतील. या सर्व लोकांचे संपूर्ण कुटुंब गृह विलगीकरण करावे. त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवावे. त्यांच्या गृह विलगीकरणाच्या कालावधीत त्यांना घरपोच जीवणावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात यावा. बाहेरून येणा-या व्यक्तींची माहिती तात्काळ मिळाल्यास त्यांना क्वारंटीन करून पुढचा धोका टाळणे शक्य होईल असे श्री भीमनवार यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर जिल्हयात येणारे १६ मुख्य मार्ग आणि ९८ छुपे मार्ग यावर तैनात पथकाने स्वयंप्रेरणेने आपले काम करावे. तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी सर्व सीमांवर काळजीपुर्वक निगराणी होते की नाही यावर लक्ष ठेवावे. या मार्गाने कोणीही विना परवानगी येता कामा नये. फिरत्या पथकाने कायम फिरत राहिल्यास अनधिकृत प्रवेशावर प्रतिबंध बसेल.
जिल्हयात जीवणावश्यक वस्तु व इतर वस्तु घेवून येणारी वाहने आणि त्यामध्ये येणारी माणसे शहरात मिसळणार नाहीत याची जास्त खबरदारी घेण्यात यावी. वाहनातील सामान अनलोडींग तळावरच उतरणे आवश्यक आहे. कारवाई करण्याचे अधिकारांचे विकेंद्रीकरण केलेले आहे. त्यामुळे त्या – त्या विभागाने अधिकार वापरून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्यात.
आरोग्य विभागाने तयार केलेल्या ११५० आरोग्या पथकामार्फत तापासणी करताना ताप, सर्दी , खोकला याची लक्षणे आढळणा-या रुग्णांना वेगळे करून त्यांच्यावर लगेच उपचार करावेत. या पथकाकडून तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकिय अधिक्षक यांनी माहिती घेवून त्याचे विश्लेषण करावे आणि रोज अहवाल दयावा. ग्रामीण भागात आरोग्य पथक जात असले तरी शहरी भागात हे पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शहरी भागातील पथकाने हे काम जास्त जबाबदारीने करणे आवश्यक आहे. कारण शहरी भागात बाहेर जिल्हयातुन येणा-यांची संख्या वाढत आहे असेही त्यांनी सांगितले.
संशयित रूग्णाचा मृत्यू झाल्यास अत्यंविधीसाठी काटेकोर काळजी घ्यावी
जिल्हयात येणा-यांची संख्या बघता काही व्यक्तींना लक्षणे दिसल्यास लगेच रूग्णालयात दाखल करून त्याचे स्त्राव कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येतात. त्यांचा चाचणी अहवाल येणे बाकी असल्यास रुग्णालयाने केलेल्या सूचनाची माहिती कुटूंबियांना दयावी. पार्थिव उघडणे, आंघोळ घालणे,हार घालणे,नमस्कार करणे अशा प्रकारचे कोणतेही काम होणार नाही यासाठी संबंधित अधिका-यांनी स्वत: लक्ष दयावे. संबंधितांच्या कुटूंबियांना लेखी पत्र देवून अंत्याविधीच्या सूचना दयाव्यात. तसेच संशयित रूग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित रूग्णालयाने त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दयावी, यामुळे पोलिसांनाही कारवाई करता येईल असे सचिन ओंबासे यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधिक्षकांनी कंटेंटमेट क्षेत्रात आत व बाहेर जाण्यासाठी एकच प्रवेशव्दार राहील याची काळजी घ्यावी. तिथे अत्यावश्याक सेवा देणा-या व्याक्तींना पासेस दयाव्यात, रात्री- अपरात्री वैद्यकिय कारणासाठी लोकांना सोडता येईल मात्र त्यांची माहिती संबधित अधिका-यांना देण्यात यावी. बाहेरून येणारे लोक स्थानिक लोकांमध्ये मिसळणार नाही याची दक्षता घेतल्यास आपण या आजारावर नक्की मात करू शकू असा विश्वास व्यक्त केला.
बैठकिला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा व आर्वीचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, वैद्यकिय अधिकारी, तालुका वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.