Home विदर्भ आखाती देशातून परतणाऱ्या भारतीयांना विदर्भपूत्राचा मदतीचा हात…!

आखाती देशातून परतणाऱ्या भारतीयांना विदर्भपूत्राचा मदतीचा हात…!

110

अडचणीतील गरजूंना डॉ. धनंजय दातार यांचा आधार…!!

यवतमाळ – कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी आणि हवाई वाहतूक बंद असल्याने संयुक्त अरब अमिरातीत(युएई) अडकलेल्या हजारो भारतीयांच्या मदतीसाठी विदर्भपूत्र व दुबईतील अल अदील समूहाचे अध्यक्ष मसालाकिंग डॉ. धनंजय दातार पुढे आले आहेत. आखाती देशातून भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या परंतु आर्थिक अडचण असलेल्या भारतीयांच्या विमान प्रवासाचा आणि कोविड चाचणीतील खर्चाचा वाटा उचलण्याची तयारी डॉ. दातार यांनी दाखविली आहे. मसालाकिंग ही पदवी मिळविणारे डॉ. धनंजय दातार हे मूळचे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील आहेत.

दोन्ही देशातील विमानसेवा पूर्ववत होताच विमानाच्या‍ तिकिटांची नोंदणी व मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांची नावनोंदणीही तेथील वाणिज्य दूतावासाकडे सुरू आहे. या सदंर्भात बोलताना डॉ. धनंजय दातार म्हणाले, ‘परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला पुढाकार व्यापक आहे. आखाती देशात रोजगार, शिक्षण, पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय टाळेबंदीमुळे तेथेच अडकून पडले आहेत. यात नोकऱ्या गमावलेल्या कामगारांचे प्रमाण मोठे आहे. हवाई वाहतूक बंद झाल्यामुळे या नागरिकांपुढील अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे या आव्हानात्मक स्थितीत आपल्या देशबांधवांना सामाजिक बांधिलकीच्या हेतूने सर्वतोपरी मदतीचा निश्चय मी व माझ्या समूहाने घेतला आहे.’ ही मदत करताना संबंधित यंत्रणांची मंजुरी घेऊन आणि सूचनांचे पालन करूनच प्रक्रिया राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे वाणिज्यदूत विपूल यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती दातार यांनी दिली.

डॉ. धनंजय दातार यांचे योगदान

डॉ. धनंजय दातार यांच्या नेतृत्वाखालील अल अदील ट्रेडिंगने नऊ हजार भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत आणण्यात महत्वाची भूमिक बजावली आहे. स्वत:च्या पिकॉक ब्रँड अंतर्गत तयार पीठ, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इस्टंट अशा श्रेणीत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत. अल अदील समूहाचे ४३ आऊटलेट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त दोन पीठ गिरण्या, दोन मसाले कारखाने असे जाळे दुबई, अबुधाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले आहे. कंपनीने ओमान, बहारिन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अतिरातीत विशेष्ज्ञ व्यापारी मार्ग स्थापन करून आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे. डॉ. दातार यांनी विविध संस्था व अनेक व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकीही जपली आहे. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यात व दुबईमध्ये मराठी उपक्रम राबविण्यात ते आघाडीवर असतात. सामाजिक, उद्योजकता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.