Home मुंबई भाजप कडुन पुन्हा बड्या दिग्गजांना मोठा धक्का, विधानपरिषदेत नविन चेहऱ्यांना संधी- भाजपात...

भाजप कडुन पुन्हा बड्या दिग्गजांना मोठा धक्का, विधानपरिषदेत नविन चेहऱ्यांना संधी- भाजपात पुन्हा नारीजीचे सुर

112

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपमध्ये धक्कादायक आणि तर्क न लावता येण्यासारखे निर्णय सहजपणे घेतात. त्याचाच प्रत्यय महाराष्ट्रातील विधान परिषदेचे पक्षाचे उमेदवार निवडताना आला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातील चार जागांसाठी पक्षाने आज आपले उमेदवार जाहीर केले.

पक्षाने राज्यातील दिग्गज नेत्यांना उमेदवारी देण्यास धाडस दाखवत नव्यांना संधी दिली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा ताई मुंडे हे विधान परिषदेवर जाणार, याची चर्चा होती. तशी त्यांनी तयारीही केली होती. प्रत्यक्षात पक्षाने या ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली नाही. विनोद तावडे यांच्या तर नावाचा विचारही केला नाही.

यामागे पक्षाने सिस्टिम बसवली आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांचे मागच्या दाराने म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद याद्वारे पुनर्वसन न करण्याचे धोरण पक्षाने ठरवले. याला शक्यतो अपवाद केला जात नाही. तोच नियम एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना लावण्यात आला. तसेच या दोन्ही कुटुंबातील एक व्यक्ती खासदार आहेच. त्यामुळे पुन्हा मागच्या दाराने त्याच कुटुंबातील व्यक्तींना संधी देण्यास पक्षाने नकार दिला.

पक्षाच्या सामाजिक पायाला या निर्णयामुळे धक्का बसू शकतो, याची जाणीव असूनही त्यास अपवाद करण्यात आला नाही. एकनाथ खडसे आणि पंकजा ताई मुंडे यांनी आपल्या पराभवा नंतर पक्षाला ललकारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे देखील पक्षश्रेष्ठी अद्याप त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. तसेच पंकजा ताई मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या सभा झाल्या. तरी त्या निवडून आल्या नाहीत. पक्षाने आणखी काय करायला हवे होते, असाही प्रश्न त्यामुळे विचारला गेला.

बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीतच संधी नाकारण्यात आली होती. त्यांच्याबद्दल अमित शहा यांचे काही समज पक्के झालेले आहेत. ते अजून निघालेले नाहीत. हाच उमेदवारी नाकारण्याचा अर्थ आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करूनही बावनकुळे यांना उमेदवारी मिळाली नाही, याचा अर्थ अमित शहांनी अद्याप बावनकुळे यांना माफ केल्याचे दिसत नाही.

पक्षाने गोपीचंद पडळकर यांना आता विधान परिषदेचे तिकिट दिले आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात बळजबरी उभे करण्यात आले होते. तेथे ते लढण्यास इच्छुक नव्हते. त्यांना तेव्हाच विधान परिषद किंवा राज्यसभा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते आता पूर्ण करण्यात आले. रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही भाजप प्रवेशासाठी दिलेले वचन पाळण्यात आले आहे. तिसरे उमेदवार डाॅ. अजित गोपछडे हे नांदेड येथील डाॅक्टर असून ते लिंगायत समाजातील आहेत. केवळ सोशल इंजिनिअरिंगच्या निकषावर ते निवडले गेले आहेत. पक्षात व समाजातही त्यांचे फारसे नाव नाही. मात्र रा.स्व. संघाच्या जवळचे ते मानले जातात. प्रवीण दटके हे नागपूचे माजी महापौर आहेत. गडकरी आणि फडणवीस अशा दोन्ही नेत्यांच्या जवळ राहण्याचे सूत्र त्यांनी सांभाळले आहे.

विधानसभा निवडणुकीत तिकिट नाकारलेले बावनकुळे आणि खडसे यांना संधी मिळण्याची शक्यता होती. खडसे यांनी तशी जाहीर इच्छाही व्यक्त केली होती. मात्र त्यांची इच्छा पुन्हा अपूर्ण राहिली आहे. बावनकुळे यांनी थेट इच्छा व्यक्त केली नव्हती. मात्र पक्षाने त्यांचा या वेळीही विचार केला नाही. सर्वाधिक धक्का हा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना बसण्याची शक्यता आहे. पंकजा यांना विधान परिषदेवर तिकिट मिळणार, याची खात्री अनेकांना होती. त्यासाठी स्वतः मुंडे यांनी तयारी करून अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे भरण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी शासकीय थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पत्र सरकारी कार्यालयांना पाठविण्यात आले होते. ते पत्रही व्हायरल झाले होते. त्यामुळे मुंडे आता काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष आहे.