Home मराठवाडा जालना जिल्हा लवकरच ग्रीन झोन मध्ये गणला जाणार

जालना जिल्हा लवकरच ग्रीन झोन मध्ये गणला जाणार

108

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या दोन महिलांचे सलग दोन अहवाल प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे या दोन्ही महिला रुग्णांची सुट्टी करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. जालना शहरातील दुःखी नगर व शिरोडा ता.परतूर येथील प्रत्येकी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.या दोन्ही महिलांवर जालना येथीलच जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या दोन्ही महिलांवर योग्य औषध उपचार केल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून दोन दिवसांपूर्वी सलग २४ तासांच्या अंतराने या दोन्ही महिलांच्या लाळेचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या दोन्ही महिलांचे अहवाल सलग दोन दिवस निगेटिव्ह प्राप्त झाल्याने सरकारी यंत्रणेसह जिल्हा वासियांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा रुग्णालयातर्फे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी सदर घोषणा लवकरच केली. जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या दोन्ही रुग्ण महिलांना सुट्टी देण्याबाबत सरकारी रुग्णालयाच्या स्तरावर हालचाली सुरू करण्यात आली असून शिरोडा ता.परतूर येथील महिलेला बुधवारी सुट्टी मिळण्याची शक्यता असून दुःखी नगर मधील महिलेला महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी सुट्टी दिली जाईल, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यानंतर जालना जिल्हा ग्रीन झोनमध्ये गणला जाईल, तोपर्यन्त जालना शहरातील जनतेसह जिल्हा वासियांना प्रतीक्षा करावी लागनार आहे.