Home महत्वाची बातमी शिवराया चा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं जोरदार...

शिवराया चा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं जोरदार दणका दिला आहे

126
0

नगरसेवक पद रद्द…!!

अमीन शाह

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर व विद्यमान अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं जोरदार दणका दिला आहे. छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.
अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम यानं महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते. संबंधित कर्मचाऱ्यानं रेकॉर्ड केलेलं हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. छिंदम याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. भाजपनं त्याच्यावर कारवाई करून त्याची पक्षातूनही हकालपट्टी केली होती.
मागील महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तो पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानं प्रायश्चित्तही घेतलं होतं. अर्थात, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आधीच्या महापालिका सभागृहानं छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव केला होता.
हा ठराव विचारार्थ राज्य सरकारकडं पाठवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात २७ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होणार होती. त्यावेळी छिंदम याला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तो उपस्थित राहिला नाही. त्यामुळं आज पुन्हा सुनावणी घेण्यात आली. त्यासही छिंदम अनुपस्थित होता. त्यामुळं त्याला अधिक संधी न देता त्याचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अनेक महापुरुषांच्या नावानं हे राज्य चालतं. असं असताना लोकप्रतिनिधीच महापुरुषांचा अवमान करत असतील तर समाजात चुकीचा संदेश जातो. हे खपवून घेतलं जाणार नाही, असं नगरविकास विभागानं म्हटलं आहे

Previous articleपहिल्या पत्नी ने दुसऱ्या पत्नीस मारून टाकले
Next articleमुस्लिम समाजाला लवकरच मिळणार आरक्षण  , अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती…!!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here