
अमिन शाह
बुलडाणा
सायबर गुन्हेगारीतील सर्वाधिक गंभीर आणि नागरिकांना भयभीत करणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकारातील फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार बुलडाण्यात समोर आला. मात्र बुलडाणा सायबर पोलीसांनी अवघ्या काही दिवसांत धडाकेबाज तपास करून 10 लाखांपैकी तब्बल 9 लाख 94 हजार 300 रुपये परत मिळवून देत राज्यात मोठी पकड दाखवली. तक्रारदार विनोदकुमार उत्तमराव साळोक (वय 42) आणि त्यांच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवरून कॉल करून सीबीआय व TRAI विभागाच्या नावाने डिजिटल अरेस्टची धमकी देत त्यांच्यावर खोटे आर्थिक गैरव्यवहार लावण्यात आले. त्यातून भीती निर्माण करून त्यांच्याकडून एक्सिस बँकेतील ‘ग्लोबल टिंबर्स’ या खात्यात आरटीजीएसद्वारे तब्बल 10 लाख रुपये भरायला लावण्यात आले होते.
या गुन्ह्यात दि. 20 ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या फसवणुकीनंतर तक्रारदाराने दि. 25 ऑगस्ट रोजी सायबर पोलिस स्टेशन, बुलडाणा येथे विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला – कलम : 204, 205, 318(2), 318(4), 319(2), 336(3), 340 (2) भा. न्या. संहिता 2023 सहकलम 66(C), 67(D), आयटी अॅक्ट. तक्रार दाखल होताच पोलिसांनी संबंधित बँकांशी तातडीने संपर्क साधून संपूर्ण पैशाचा डिजिटल प्रवास ट्रेस करण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला. पैसे विविध खात्यांत वळविल्याचे आढळताच सायबर पथकाने सर्व खाती एकामागून एक Freeze केली. तांत्रिक विश्लेषणातून वळवलेली रक्कम मिझोरम राज्यातील एका खात्यात गेल्याचे समोर आले. बुलडाणा सायबर पथकाने कारवाई करत ते खाते गोठवले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी 9,94,300 रुपये तक्रारदारांच्या खात्यात जमा करण्यात आले. ही कामगिरी जिल्ह्यात अभूतपूर्व मानली जात असून बुलडाणा सायबर पथकाच्या तांत्रिक कौशल्याचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. ही प्रशंसनीय मोहीम पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर, तपास अधिकारी पोनि. संग्राम पाटील, सपोनि प्रमोद इंगळे, पोहेकॉ रामेश्वर मुंढे, प्रशांत गावंडे, राहुल इंगळे आणि केशव
या सायबर पथकाने पूर्ण केली. पोलीस, सीबीआय, ट्राई किंवा कोणतीही शासकीय संस्था व्हॉट्सअप कॉल / व्हिडिओ कॉल करून कोणालाही अटक करत नाही. अनोळखी व्हॉट्सअॅप कॉलला कधीच प्रतिसाद देऊ नये. ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन : 1930 /1945, वेबसाईट : cybercrime.gov.in किंवा नजीकचे पोलीस स्टेशन / बुलडाणा सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे ,
–











































