
ज्ञानोबा तुकाराम च्या गजरात वैकुंठ गमन सोहळा.
वारकऱ्यांची माय गेल्यामुळे आम्ही पोरके झालो.
सतीशचंद्र रोठे,
अमीन शाह
बुलढाणा/मोताळा
वारकरी धर्म परिषदेच्या ज्येष्ठ मार्गदर्शक हभप दुर्गामाई धोंडू व्यवहारे यांच्या वैकुंठ गमनाने वारकरी धर्म परिषद आईच्या मायेपासून,मार्गदर्शनापासून पोरकी झाली आहे. वारकरी धर्म परिषदेच्या मार्गदर्शक दुर्गामाई वारकरी सांप्रदायिक कार्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यतत्पर होत्या. दुर्गामाई वारकऱ्यांच्या प्रेरणास्तोत्र होत्या,अशी भावनांजली वारकरी धर्म परिषदेचे संयोजक हभप सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केल्या.
मोताळा तालुक्यातील ग्राम सारोळा मारोती येथील राहत्या घरी 13 जुलैला रात्री वयाच्या 85 व्या वर्षी वैकुंठवाशी झाल्या. टाळ, मृदुंग आणि ज्ञानोबा तुकाराम च्या गजरात त्यांची वैकुंठगमन यात्रा काढत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. सारोळा मारोती येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांचा अंतिम विधी पूर्ण करीत त्यांना मुखाद्मी देण्यात आली. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू पंतू असा मोठा आप्तपरिवार आहे. वैकुंठ गमन सोहळ्याला वारकरी धर्म परिषदेचे संयोजक हभप सतीशचंद्र रोठे पाटील, शिवसेना नेते भोजराज पाटील, सुखदेवराव शीप्पलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रामेश्वर पाटील, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, पोलीस पाटील ढकचवळे,ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य यांच्यासह वारकरी धर्म परिषद मोताळा तालुका पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील वारकरी समाज बांधव नातेवाईक आप्तेष्ट बहुसंख्येने उपस्थित होते.











































