Home यवतमाळ अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी लाभ घेण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे आवाहन

अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी लाभ घेण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे आवाहन

264

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांसाठी ८ डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ- मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांसाठी ८ डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी व व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

केंद्र शासनामार्फत कर्ज स्वरूपात प्राप्त होणाऱ्या निधीतून त्यांच्या योजनांची अंमलबजावणी मौलाना अबुल कलाम आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यांमध्ये करण्यात येते. तसेच राज्य शासनामार्फत भाग भांडवल स्वरूपात प्राप्त होणाऱ्या निधीतून विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. *योजनांची उत्पन्न मर्यादेच्या आधारे*
*क्रेडिट लाईन १- उत्पन्न मर्यादा १ लक्ष २० शहरी व ९८ हजार ग्रामीण भागासाठी*

*क्रेडिट लाईन २ – कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत अशी विभागणी केली आहे*.

*शैक्षणिक कर्ज योजना*
क्रेडिट लाईन १ नुसार भारतातील शिक्षणाकरिता १ लक्ष २० हजार परदेशातील शिक्षणासाठी २ लक्ष ३० हजार रुपये आहे. व्याज दर ३ टक्के आहे. तर क्रेडिट लाईन २ नुसार व्याजाचा दर पुरुष ८ टक्के , महिला ५ टक्के आहे.

*मुदत कर्ज योजना*
क्रेडिट लाईन १ नुसार कर्ज मर्यादा वीस लाखापर्यंत, व्याज दर ८ टक्के तर क्रेडिट लाईन २ नुसार रुपये तीस लाखापर्यंत, व्याजदर पुरूष ८ टक्के अधिक २ टक्के हमी शुल्क असा १० टक्के राहील. तर महिलांसाठी ८ टक्के राहिल.

*सुक्ष्म पतपुरवठा योजना*
क्रेडिट लाईन १ नुसार सदस्य संख्या २० असणा-या गटासाठी प्रत्येक सदस्य रुपये एक लाख असे एका गटासाठी वीस लाख, व्याज दर ९ टक्के तर क्रेडिट लाईन २ नुसार वीस सभासद असणा-या गटासाठी प्रत्येक सदस्य रुपये १ लाख ५० हजार असे एका गटासाठी ३० लाख,व्याजदर पुरुष १२ टक्के महिला १० टक्के राहील.

११ नोव्हेंबर २०२२ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनामार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून त्यांच्या सुधारित योजनेनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सदरचे अर्ज महामंडळाच्या सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. शासनाच्या www.mdd.maharashtra.gov.in
व महामंडळाच्या
www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सदर योजनांतर्गत अर्ज करणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना ८ डिसेंबर २०२२ रोजी अल्पसंख्यांक दिनानिमित्त कर्जवाटप करण्यात येणार आहे.