Home यवतमाळ पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार...

पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार – किशोर तिवारी

370

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी – पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळी (सदोबा) परिसरातील दातोडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर मंदीर परिसरातील गुप्तधन प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर व दातोडी गावातील तंटामुक्त गांव समितीचे माजी अध्यक्ष गणपत पाटील जगताप यांच्या उपोषणाला कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी भेट दिली. या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे करण्यात येईल व जे कुणी या प्रकरणी दोषी असेल त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांना निंबु शरबत देऊन त्यांचे उपोषण सोडविले.
सविस्तर वृत्त असे की, 19 मे 2021 रोजी दातोडी गावातील सिद्धेश्वर मंदीर परिसरात एक जेसीपी मशीन व दोन चारचाकी गाड्या गुप्तधन शोधत असल्याचे कळाल्याने पारवा पोलिसांनी त्यांना पकडून नंतर सोडून दिले. या संदर्भात जेसीपी मशीन व दोन चारचाकी गाड्या पारवा पोलीसांनी जप्त न करता आणि त्यातील लोंकावर केवळ कोरोना संदर्भातला गुन्हा नोंदविण्यात आला.
गुप्तधन संदर्भातला गुन्हा नोंद केला नाही. या बाबतची तक्रार तसेच त्यांच्या वाहनातून पूजेचे सर्व साहित्य जप्त केले होते. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे होती. जिथे गाड्या पकडल्या ते स्थळ सावळी (सदोबा) येथील कापेश्वर रोडवरील पेट्रोल पंपाजवळचे असतांना चौकशीत ते स्थळ सिद्धेश्वर मंदीर कां दाखविले या व असे अनेक मुद्दे घेऊन मुबारक तंवर व गणपत पाटील जगताप यांनी दोषी तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ व संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे चार वेळा निवेदन देऊन केले होते. दोषी विरुद्ध कारवाई होत नसल्याने मुबारक तंवर व गणपत पाटील जगताप यांनी दिनांक 2 मार्च 2022 पासून सावळी (सदोबा) येथील नायब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी किशोर तिवारी यांनी या उपोषणाची दखल घेत उपोषणकर्त्यांशी प्रत्यक्ष जाऊन संपर्क साधला व चर्चा केली आणि या प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी असेल त्यांची निष्पक्षपणे चौकशी होउन दोषीं विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन किशोर तिवारी यांनी देउन उपोषणकर्त्यांना आपल्या हस्ते निंबु शरबत देऊन उपोषणाची सांगता केली.
त्यांच्यासोबत पांढरकवड्याचे प्रभारी उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार साहेब, पारवा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार रामकृष्ण महल्ले आदीं उपस्थित होते.
उपोषण मंडपात बसलेल्या उमरी कापेश्वर येथील काही महिलांनी उमरी येथील वार्ड नंबर दोन मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई व रस्त्याच्या बाबतचे प्रश्न तसेच तेथील प्रशासक हे गावांत येत नाही, लक्ष घालत नाही व गावकऱ्यांचे ऐकत नाही अशी तक्रार यावेळी किशोर तिवारी यांच्याकडे केली. या बाबत किशोर तिवारी यांनी संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे व पाणी टंचाई सोडण्याचे आदेश दिले. सावळी (सदोबा) व परिसरातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मध्यवर्ती सहकारी बँकेतून गेल्या पांच सहा महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याची तक्रार काही महिला व पुरुष यांनी केल्यानंतर किशोर तिवारी यांनी ऊपस्थित नायब तहसीलदार तुंडलवार व इतर कर्मचारी व बँकेचे कर्मचारी यांची चांगलीच कान उघाडणी केली.
आणि पंधरा तारखेच्या आंत या लाभार्थ्यांना अनुदान मिळाले पाहिजे असे आदेश यावेळी दिले.