Home विदर्भ घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निता आकाश जाधव व सदस्या कालींदा आत्राम विरुद्धची...

घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निता आकाश जाधव व सदस्या कालींदा आत्राम विरुद्धची याचिका जिल्हाधिकारी न्यायालयात खारीज…!

1248

➡️ यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश.!

( अयनुद्दीन सोलंकी )

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निता आकाश जाधव व सदस्या कालींदा रणधीर आत्राम यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी याचिका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पंचायत समिती सदस्य अभिषेक शंकरराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या न्यायालयात दाखल केली होती. मात्र, सदरची याचिका जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुराव्या अभावी खारीज केली आहे. याचिकाकर्ता अभिषेक ठाकरे यांची बाजू अँड. रविशेखर बदनोरे यांनी मांडली.
➡️ घाटंजी पंचायत समीतीमध्ये भाजपाचे चार पंचायत समिती सदस्य, तर शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक पंचायत समिती सदस्य कार्यरत होते. तसेच पंचायत समिती सभापती, उप सभापतीची निवडणुक 8 जानेवारी 2020 रोजी ठरल्यानंतर अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार पुजा माटोडे यांनी 27 डिसेंबर 2019 रोजी पंचायत समिती सदस्यांना नोटीस बजावली. त्यामुळे भाजपा गट नेता तथा पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचा व्हिप जारी केला. भाजपाचे घाटंजी तालुका अध्यक्ष गुड्डू उर्फ राजु शुक्ला, भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, गट नेता अभिषेक ठाकरे हे व्हिप बजावण्यासाठी निता आकाश जाधव, कालींदा रणधीर आत्राम यांच्या घरी गेले असता ते घरी हजर नव्हते. तर त्यांच्या कुटुंबियांनी पक्षादेश घेण्यास नकार दिला.
➡️ त्यामुळे पक्षादेशाचा अनादर केल्यामुळे घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निता आकाश जाधव व सदस्या कालींदा रणधीर आत्राम यांना महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य सभासद अनहर्ता कायदा 1986 व नियम 1987 अंतर्गत उत्तरवादी निता जाधव व कालींदा आत्राम हिला कायद्याचे कलम 3 प्रमाणे अपात्रता अर्जित केलेली असल्याने त्यांचे सदस्यत्व नियम 6 प्रमाणे रद्द करण्याची मागणी, भाजपा गट नेता तथा पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद होउन 3 महिने झाले तरी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश पारीत केलेला नव्हता. अखेर दोन दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने खारीज केला. या मुळे घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निता जाधव व कालींदा आत्राम हे दोघेंही पदावर कायम आहेत. विशेषतः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्या अगोदरच सदर निकाल लागल्याने घाटंजी पंचायत समिती अंतर्गत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. याचिकाकर्ता अभिषेक ठाकरे यांची बाजू अँड. रविशेखर बदनोरे यांनी न्यायालयात मांडली होती, हे विशेष.