Home विदर्भ आमदार संजय राठोड यांची कोविड हॉस्पीटलला चक्क दहाव्यांदा भेट

आमदार संजय राठोड यांची कोविड हॉस्पीटलला चक्क दहाव्यांदा भेट

451
0

वॉर्डाची पाहणी व रूग्णांची चौकशी

यवतमाळ – जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय आणि खासगी दवाखान्यातही रूग्णांना जागा मिळत नसल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. या अनुषंगाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमधील कोराना वॉर्डात प्रत्यक्ष भेट देऊन संजय राठोड यांनी परिस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून संजय राठोड यांनी आज तब्बल दहाव्यांदा कोरोना वॉर्डात भेट देऊन पाहणी करत रूग्णांची आस्थेने चौकशी केली.
जिल्ह्यात दररोज सरासरी ५०० च्या वर कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. तर आता मृतांची संख्याही दररोजी १० ते २० च्या घरात आहे. त्यामुळे सर्वत्र नागरिक भयभीत आहेत. शिवाय रूग्णसंख्या वाढल्याने शासकीय, खासगी कोणत्याच दवाखान्यात उपचारासाठी खाटा उपलब्ध नाहीत. यासंदर्भात संजय राठोड यांच्याकडे अनेक नागरिक प्रत्यक्ष, दूरध्वनीवर संपर्क साधून तक्रार करीत असून उपचारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करीत आहेत. त्याची दखल घेत संजय राठोड यांनी आज गुरूवारी दुपारी साडेचार वाजता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये भेट दिली. या ठिकाणी कोविड विषयक नियमांचे पालन करीत सर्वच कोविड वॉर्डांना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. याशिवाय दाखल असलेल्या अनेक रूग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
दवाखान्यातील उपचारांबाबत रूग्णांनी समाधान व्यक्त केले असले तरी सध्याच्या या बिकट परिस्थितीतही येथील यंत्रणा तोकडी पडत असल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनासह, आरोग्य यंत्रणा, वॉर्डातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदी सर्वच जण कर्तव्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. येथील प्रत्येकजण आपले कार्य प्रामाणिकपणे बजावत आहे. मात्र परिस्थितीच विपरित असल्याने नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन संजय राठोड यांनी यावेळी केले. सुपर स्पेशालिटीमध्ये ५७७ खाटांचे नियोजन असले तरी आता रूग्ण वाढल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने अतिरिक्त खाटांचे नियोजन करून रूग्णांना दिलासा देण्याच्या सूचना यावेळी राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
गेल्यावर्षी कोरोना लाट उच्चांकी पातळीवर असताना संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डात सतत आठवेळा भेट देऊन परिस्थिती जाणून घेत प्रशासनास विविध सूचना करून यंत्रणेच्या कार्यपद्धतीत अनेक सुविधा घडवून आणल्या होत्या. आता मागील दोन महिन्यात राठोड यांनी दोनवेळा येथील कोरोना वॉर्डात भेट देऊन रूग्णांची विचारपूस केली. कोरोना संसर्गाची भीती मनात न ठेवता जनतेला दिलासा देण्यासाठी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेस अधिक उत्तम कामाचे प्रोत्साहन देण्यासाठी चक्क दहा वेळा या वॉर्डात येणारा असा लोकप्रतिनिधी विरळाच, अशा प्रतिक्रिया या भेटी दरम्यान रूग्णालय परिसरात होत्या. संजय राठोड यांच्या या भेटीनंतर प्रशासनाने आणखी दोन अतिरिक्त वॉर्ड सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आल्याची माहिती दिली. रूग्णांची गैरसोय होऊ न देता त्यांना योग्य उपचार देण्यासाठी आणि कोरोना चाचणी करणाऱ्या नागरिकांना त्यांचे अहवाल शक्य तेवढ्या लवकर उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय प्रशासनाने अधिक गतीमान व्हावे, अशा सूचना यावेळी संजय राठोड यांनी केल्या. यावेळी त्यांच्यासोबत अभ्यागत मंडळाचे सदस्य राजेंद्र गायकवाड व विकास क्षीरसागर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, अधिकारी उपस्थित होते.