Home मराठवाडा जालना जिल्ह्यातील तारूण्यावर कोरोनाची सर्वाधिक माया…

जालना जिल्ह्यातील तारूण्यावर कोरोनाची सर्वाधिक माया…

118

लक्ष्मण बिलोरे

गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात एकूण २१७३ कोरोना बाधीत रूग्ण

जालना जिल्ह्यात आजपर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधीत रुग्णांपैकी सर्वाधिक ६१५ रुग्ण हे ३१ ते ४५ या वयोगटातील असल्याचे आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.जिल्हा प्रशासनाकडे काल दि.३० जुलै, शुक्रवारी दुपारपर्यंत उपलब्ध असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात आढळून आलेल्या एकुण २१२० रुग्णांपैकी सर्वाधिक ६१५ रुग्ण हे ३१ ते ४५ या वयोगटातील असून त्यापाठोपाठ १६ ते ३० या वयोगटातील ५५८, ४६ ते ६० या वयोगटातील ४५५, ६१ ते ७५ या वयोगटातील २५० आणि ० ते १५ या वयोगटातील २४२ रुग्ण कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात जिल्ह्यात एकूण २१७३ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महिना निहाय आढळून आलेल्या कोरोना बाधीत रूग्णांची संख्या अशी – एप्रिल=३, मे= १२३,जून =४२८, ३० जुलै पर्यंत=१५६६ या प्रमाणे असून यामध्ये शहरी भागातील १७७५तर ग्रामीण भागातील केवळ ३४५रुग्णांचा समावेश आहे. शहरी भागात आढळून आलेल्या १७७५ रुग्णांपैकी सुमारे १६४५ रुग्ण हे जालना शहरातील आहेत.त्यातही नवीन जालना भागातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे उपलब्ध आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. एकूण २१२० रुग्णांमध्ये १२५७ पुरुष तर ८६३ महिला रुग्णांचा समावेश आहे. कोरोना मुळे मे महिन्यात पहिला मृत्यू झाला होता.जून मध्ये १४ तर जुलै महिन्यात काल ३० तारखेपर्यंत एकूण ६७ जणांचा बळी गेला आहे.काल ३० जुलै रोजी दुपार पर्यंत उपचार घेत असलेल्या एकूण ७७०रुग्णांपैकी ६३४ रुग्ण हे शहरी भागातील असून त्यापैकी ५८५ रुग्ण हे एकट्या जालना शहरातील आहेत. ग्रामीण भागातील केवळ १३६ रुग्णांचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण २६ डॉक्टर्स कोरोना बाधीत झाले असून त्यात ५ सरकारी तर २१ खाजगी डॉक्टरांचा समावेश आहे. परिचारिका व इतर मिळून ३८ जण कोरोना बाधीत झाले असून त्यात सरकारी यंत्रणेतील १३ तर २५ जण हे खाजगी रुग्णालयातील आहेत.दरम्यान, जिल्ह्यात काल शुक्रवार पर्यंत ९५२ जणांची अँटीजण चाचणी घेण्यात आली असून त्यात १०१ संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात भोकरदन मध्ये ४४ पैकी दोघांचे,घनसावंगीत ३९ पैकी दोघांचे, मंठ्यात ७३ पैकी बारा आणि जालना शहरात ७९५ पैकी ८५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.