Home मराठवाडा जालन्यात कोरोनाचा तिसरा बळी गेल्याने उडाली खळबळ…!

जालन्यात कोरोनाचा तिसरा बळी गेल्याने उडाली खळबळ…!

324

लक्ष्मण बिलोरे

जालना – कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बळी गेले असतांनाच आज गुरुवारी जालना शहरातील लक्ष्मीनारायण पुरा भागातील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून कोरोनाचा जालना जिल्ह्यातील हा तिसरा बळी ठरला आहे. जालना जिल्ह्यात यापूर्वी परतूर तालुक्यातील मापेगाव येथील एका 45 वर्षीय व्यक्तीसह जालना शहरातील मोदीखाना भागातील 80 वर्षीय वृध्द व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता. जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील 60 वर्षीय महिला मंगळवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. डायबिटीस, बीपी इत्यादी आजाराने ग्रस्त असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर सदर महिलेच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते असे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. मंगळवारी दाखल झाल्यानंतर या महिलेच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोग शाळेकडून सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचार सुरू असताना आज गुरुवारी दुपारी सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.