Home विदर्भ साहेब…घरातला कापूस आमच्या “सरणां “साठी राखुन ठेऊ काय? – अनुप चव्हाण शेतकरी

साहेब…घरातला कापूस आमच्या “सरणां “साठी राखुन ठेऊ काय? – अनुप चव्हाण शेतकरी

178

देवानंद जाधव

यवतमाळ – मायबाप सरकार , तुमच्या अंगावरील कपड्यांचा प्रत्येक धागा अन् धागा माझ्या बापाने, घाम गाळुन, ऊन्हातान्हात रक्त ओकुन पिकवलेल्या कापसाचा आहे. कापूस विकुन कर्ज फेडण्याचे आणि वयात आलेल्या मुली चे हात पिवळे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या शेतकर्यांच्या स्वप्नांचे गर्भपात करण्याचे महापाप, या अंधारात उंदीर पकडणार्या व्यवस्थेने केलेत. वावर वावर करता करता हयात आमची गेली, तरी आमच्या जिंदगानीत सुगी नाही आली. आमचा शंभर किलो कापूस चार साडेचार हजारांचा, अन् कारखानदाराची शंभर ग्रॅम वजनाची “चड्डी “”ची जोडी चारशे रुपयांची, अहो साहेब,,,कुठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा?आमच्या तमाम भूमिपुत्रांची अवस्था अर्धवट ठेचलेल्या सापासारखी झाली आहे. शेतकर्याच्या डोळ्यातुन धरणी मायवर टपकलेल्या आसवांच्या थेंबातुन, कापसाची निर्मिती झाली साहेब. ऊस,कापूस, शिकुन बॅंकेचे कर्ज फेडण्याचे आणि वयात आलेल्या मुली चे हात पिवळे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या शेतकर्यांची स्वप्न दिवास्वप्न ठरलीत.मुलाला डाॅक्टर, इंजिनियर करीन ,ही शेतकर्यांनी बघीतलेली स्वप्ने ,वावरातील ढेकळांगत जागच्या जागी मुरुन गेलीत. माणसांची निर्मिती झाल्या पासून, शेतकर्यांच्या आयुष्याच्या सातबार्या वर आधीससच आभाळभर असलेली दुःखाची नोंद ,काळजावर डागण्या देणारी आणि अत्यंत वेदनादायी आहे. निसर्गाची गानसम्राज्ञी कोकिळा आमच्या घरादारावर येऊन, पेरणीची सोय लावण्यासाठी खुणावते आहे. चिमण्या पाखरांची ही आप आपली घरटी उभारण्यासाठी भटकत असल्याचे वास्तव आहे .साहेब,,,,आम्ही आमच्या माय च्या, आमच्या बायकोच्या गळ्यातील फुटक्या मण्याचं मंगळसूत्र गहान ठेऊन कोंबड्या कसायाच्या स्वाधीन करुन ,आम्ही जगाच्या भुकेची आग शमविण्यासाठी, वावरात बरगड्या उघड्या पडे पर्यंत रक्त ओकायचं, हे आपणास संयुक्तिक वाटते का?साहेब. असा काळीज चिरत नेणारा सवाल यवतमाळ तालुक्यातील बोथ बोडन या आत्महत्या ग्रस्त गावातील, अनुप चव्हाण माणीक कवडु झामरे, विश्वनाथ राठोड, किसन झामरे, बाळु डोळे,यांनी मायबाप सरकार ला विचारला आहे.