Home यवतमाळ यवतमाळचे सुपुत्र अविनाश लोखंडे यांना ‘बॉडी बिल्डिंग’ विषयात आचार्य पदवी

यवतमाळचे सुपुत्र अविनाश लोखंडे यांना ‘बॉडी बिल्डिंग’ विषयात आचार्य पदवी

305
यवतमाळ – आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने सामाजिक, क्रीडा आणि कृषी क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारे यवतमाळचे सुपुत्र आणि स्थानिक शिव मसल्स अँड फिटनेस सेंटरचे संचालक अविनाश शिवदासराव लोखंडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ‘आचार्य’ (पीएच.डी.) पदवी अधिकृतपणे बहाल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘बॉडी बिल्डिंग’ (शरीर सौष्ठव) या विषयात पीएच.डी. प्राप्त करणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती ठरले असून, त्यांच्या या सुवर्णमय ऐतिहासिक यशामुळे यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२६ मे रोजी त्यांना ही पदवी अधिकृतपणे प्राप्त झाली असून, या मानाच्या यशामुळे यवतमाळ डिस्ट्रिक्ट कराटे असोसिएशनसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. अविनाश लोखंडे हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असून त्यांनी खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, आयोजक आणि व्यायामशाळा संचालक म्हणून आपले अमूल्य योगदान दिले आहे. ते स्वतः कुस्ती, बॉडी बिल्डिंग, थाळीफेक, गोळाफेक, कबड्डी आणि वेटलिफ्टिंग या खेळांचे माजी उत्कृष्ट खेळाडू राहिले असून त्यांनी विदर्भ तसेच राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या या दांडग्या अनुभवामुळे ते सध्या विदर्भ शरीर सौष्ठव संघटनेचे उपाध्यक्ष, शरीर सौष्ठव संघटनेचे राष्ट्रीय पंच, विदर्भ जजिंग कमिटीचे चेअरमन, विदर्भ कुस्तीगीर संघाचे कोषाध्यक्ष आणि पंच म्हणून अत्यंत चोख कामगिरी बजावत आहेत. यासोबतच ते यवतमाळ डिस्ट्रिक्ट कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष, यवतमाळ डिस्ट्रिक्ट नेटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि यवतमाळ डिस्ट्रिक्ट वुशु असोसिएशनचे सहसचिव म्हणूनही क्रीडा विश्वाचा डोलारा सांभाळत आहेत. त्यांच्या याच क्रीडा क्षेत्रातील अभ्यासाचा परिपाक म्हणजे त्यांनी मिळवलेली डॉक्टरेट पदवी होय. त्यांनी यवतमाळ येथील नानकीबाई कला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागात प्राचार्य डॉ. जयंत चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली “विदर्भातील शरीर सौष्ठव पटूंचे प्राविण्य व त्यांच्या स्पर्धात्मक सहभागास प्रभावित करणाऱ्या विविध घटकांचे विश्लेषणात्मक अध्ययन” या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले.
केवळ क्रीडा क्षेत्रच नव्हे, तर कृषी क्षेत्रातही त्यांनी आधुनिक प्रयोग करून जरबेरा, कलर कॅप्सिकम आणि शेवग्याची यशस्वी शेती केली आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे डॉ. लोखंडे तरुण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी “धरू व्यायामाची कास! करू व्यसनाचा ऱ्हास!, व्यसनमुक्तीचा मंत्र खास रोज व्यायाम फक्त अर्धा तास, व्यायाम करी शरीर सुदृढ आणि मस्त व्यसनकरी जीवन उद्ध्वस्त” हा प्रेरक संदेश देतात. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विविध सामाजिक संघटना व क्रीडा संघटनानी त्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरित करणारे त्यांचे दिवंगत वडील शिवदासराव लोखंडे, आई नलिनी, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. जयंत चतुर, डॉ. श्रीकांत अलोने, डॉ. आनंद भुसारी, बंधू धनंजय लोखंडे, पत्नी राधिका, मुलगी शिवाली आणि मुलगा शिवराज लोखंडे, सर्व मित्र परीवार यांना देतात.