
युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओमराजे गायकवाड यांचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे निवेदन
रवि अन्ना जाधव
देऊळगाव राजा प्रतिनिधी
जिल्ह्यातील पुरवठा विभागातील प्रचंड अनियमितता, निकृष्ट धान्याचे वाटप आणि गोरगरिबांची उघड उघड होत असलेली फसवणूक याबाबत युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओमराजे गायकवाड यांनी धडक भूमिका घेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
विशेषतः नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या रेशनमधील तांदूळ आणि ज्वारीच्या दर्जाबाबत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हे धान्य एवढ्या निकृष्ट प्रतीचे होते की जनावरांनीही खाण्यायोग्य नसताना, तेच धान्य गरीब कुटुंबांना देण्यात आले. धान्यात आळ्या, किडे, भुंग, जाळ यांचा प्रचंड प्रमाणात समावेश होता.
गोरगरिबांना जगण्यासाठी रेशनवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्याच कष्टाच्या ताटात निकृष्ट अन्न टाकून त्यांची थट्टा करण्यात आली, असा घणाघात संतोष भुतेकर व गायकवाड यांनी केला.
नेमकं हे निकृष्ट धान्य मंजूर करणारा अधिकारी कोण? धान्य पुरवणारी यंत्रणा कोण? आणि हे सगळं खपवून घेणारा “शासनाचा जावई” नक्की आहे कोण? – अशी कठोर विचारणा निवेदनात करण्यात आली आहे.
भुतेकर म्हणाले, “वर्षानुवर्षे हीच मनमानी होत आहे. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी गरीबांच्या ताटातील धान्यावर डल्ला मारला जातो. यावर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
दुसरा गंभीर मुद्दा : गरीबांना पैसेही नाही, धान्यही नाही!
गेल्या दोन-तीन वर्षापासून पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी अनेक कुटुंबांकडून ‘धान्याऐवजी पैसे मिळणार’ या कारणावरून फॉर्म भरून घेतले.
परंतु ना पैसे मिळाले, ना धान्य!
संबंधित नागरिक वारंवार पुरवठा विभागाची पायरी झिजवत आहेत, पण अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही.
याबाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे की—
तात्काळ त्या नागरिकांना धान्य द्यावे
किंवा
त्यांच्या खात्यात सर्व थकलेली रक्कम जमा करावी
आणि
नेमका अडथळा कुठे आहे याचा स्पष्ट खुलासा जनतेसमोर करावा.
23 डिसेंबरला तीव्र आंदोलन
वरील सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व धान्य पुरवठादारांवर कठोर कारवाई न झाल्यास,
दि. 23 डिसेंबर 2025 रोजी जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा युवासेना व विद्यार्थी सेनेतर्फे देण्यात आला.












































