Home बुलडाणा टाकरखेड भागीले ग्रामस्थांचा वाईन बारविरोधात तीव्र आक्रोश परवाना रद्द न केल्यास १०...

टाकरखेड भागीले ग्रामस्थांचा वाईन बारविरोधात तीव्र आक्रोश परवाना रद्द न केल्यास १० डिसेंबरला रास्ता रोको

374

टाकरखेड भागीले ग्रामस्थांचा वाईन बारविरोधात तीव्र आक्रोश
परवाना रद्द न केल्यास १० डिसेंबरला रास्ता रोको

देऊळगाव राजा प्रतिनिधी ता. देऊळगाव राजा :

टाकरखेड भागिले येथील गावातील हॉटेल स्वप्नपूर्ती वाईन बार तात्काळ बंद करावा तसेच परवाना रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच सौ. द्वारका रविंद्र भागिले, उपसरपंच नितेश देशमुख, रवी भागिले, सचिन भागिले, गजानन भागिले, देविदास पटावकर यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
ग्रामपंचायतीची कोणतीही ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) नसताना गट क्रमांक १७७/१ येथे वाईन बार सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. याबाबत १७ सप्टेंबर २०२५ रोजी विशेष ग्रामसभेत व २७ नोव्हेंबर २०२५ रोजी मासिक सभेत वाईन बारला गावाने एकमताने विरोध दर्शवित ठराव संमत केला होता.
वाईन बारजवळ जिल्हा परिषद शाळा असल्याने लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, तसेच तरुण वर्ग व्यसनाधीन होण्याचा धोका वाढेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. “गावातील काही कुटुंबे दारूच्या व्यसनामुळे आधीच उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे हा बार कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे,” अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली.
यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्यास १० डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर–नागपूर महामार्गावर वाईन बारसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्या आहेत.