
चोरटे सीसीटीव्हीत कैद — महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा :-तालुक्यातील देऊळगाव मही शहरात डोडरा येथील ६५ वर्षीय उर्मिला नर्सिंग परिहार यांच्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी गुंगीचा स्प्रे फवारून दागिने लुटल्याची गंभीर घटना दुपारी साधारण बारा वाजता दिग्रस चौक परिसरात घडली. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा तपशील
उर्मिला परिहार या काही कामानिमित्त देऊळगाव मही येथे आल्या होत्या. दिग्रस चौकाजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या जवळ येत विषारी गुंगीचा स्प्रे फवारला. त्यामुळे त्या बेशुद्धावस्थेत गेल्या. याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तसेच हातातील चांदीच्या पाटल्या उतरवून लंपास केल्या.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन
या घटनेनंतर देऊळगाव मही शहरातील सर्व माता-भगिनींना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांसाठी सूचना :
अनोळखी व्यक्तीजवळ उभे राहू नये
कोणाशीही अनावश्यक संवाद साधू नये
संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे
बाजारपेठ, बस स्टँड, बँक परिसरात विशेष काळजी घ्यावी
आरोपींचा व्हिडिओ उपलब्ध
सदर चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ उपलब्ध असून, आरोपी ओळखीचे असल्यास तात्काळ पोलिस स्टेशन देऊळगाव मही किंवा संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस तपास सुरू
देऊळगाव मही पोलिसांनी चोरट्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास सुरू केला असून, लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.











































