Home नांदेड “गोदावरी अर्बन” कर्मचाऱ्यांचा थायलंड दौरा यशस्वी…!

“गोदावरी अर्बन” कर्मचाऱ्यांचा थायलंड दौरा यशस्वी…!

213

आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता आणि आधुनिक बँकिंग दृष्टीकोनात लक्षणीय वाढ होईल. त्याचा थेट लाभ गोदावरी अर्बनच्या सेवा गुणवत्तेत आणि भावी प्रगतीत निश्चित जाणवेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

गोदावरी अर्बनने संस्थेची सेकंड लाइन लीडरशिप घडविण्याच्या उद्देशाने गेल्या तीन वर्षापासून नेतृत्व विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या उपक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून निवडक 23 कर्मचाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय अध्ययन दौरा नुकताच थायलंडमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. थायलंडमधील असोसिएशन ऑफ आशियान कॉन्फडरेशन ऑफ क्रेडीट युनियन्स या आंतरराष्ट्रीय संस्थेला भेट दिली.
यावेळी गोदावरी अर्बनच्या प्रतिनिधी मंडळाने क्रेडिट युनियन व्यवस्थापनातील नवकल्पना, आशियाई सहकार क्षेत्रातील आधुनिक प्रवाह आणि जागतिक स्तरावरील सेवा मॉडेल्सचा सखोल अभ्यास केला. यावेळी त्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एलेनिटा व्ही. सॅन रोक, मुख्य तांत्रिक अधिकारी रणजीत हेट्टियाराची यांनी मार्गदर्शन केले. तसेच सेन्ट पीटर क्रेडीट युनियन को ऑपरेटीव्ह या संस्थेला देखील भेट दिली. यावेळी बँकॉकमधील आर्थिक व्यवहार, स्थानिक सहकारी बँकिंगची रचना, डिजिटल सेवा प्रणाली आणि ग्राहक केंद्री व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष समरोएंग बून-अरुण रक, कर्ज समितीचे अध्यक्ष सोमसोंग बून-अरुनक, सरव्यवस्थापक साकारिन कित्सावत यांच्यासह समस्त संचालक मंडळ उपस्थित होते. हा महत्त्वाकांक्षी अभ्यास दौरा संस्थेचे संस्थापक नामदार हेमंत पाटील यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनातून, अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या प्रेरक संकल्पनेतून, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या प्रभावी नियोजनातून, यशस्वीरीत्या पार पडला.

या दौऱ्यात व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सचिव अॅड. रविंद्र रगटे, संचालक प्रा. सुरेश कटकमवार, संचालक वर्षा देशमुख, या नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुमलता राव, उपसरव्यवस्थापक रवी इंगळे, उप सरव्यवस्थापक विजय शिरमेवार यांच्यासह नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील समस्त अधिकारी सहभागी झाले होते.

अभ्यास या आंतरराष्ट्रीय दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना जागतिक पातळीवरील बँकिंग सिस्टिम्स, डिजिटल फिनटेक मॉडेल्स, आंतरराष्ट्रीय को-ऑपरेटिव्ह फेडरेशनचे कामकाज तसेच कार्यपद्धती व नवोन्मेषी व्यवस्थापन पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देणे हे होते. भावी नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन, व्यावसायिकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला. अभ्यास दौऱ्यात सहभागी 23 अधिकाऱ्यांचे चार गटांमध्ये विभाजन केले होते.