Home नांदेड अनैतिक संबंधातून पतीचा खून – पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल.

अनैतिक संबंधातून पतीचा खून – पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल.

328

प्रतिनिधी:मजहर शेख,किनवट/नांदेड

किनवट,दि ,१४:- अनैतिक संबंधातून पतीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध खुनासह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मथुरानगर, किनवट येथील विनोद किसन भगत (वय ५२) यांचा मृतदेह २ सप्टेंबर २०२५ रोजी महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैनगंगा नदीत सापडला होता. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे समजले; मात्र तपासात या मृत्यूमागे अनैतिक संबंध आणि कटकारस्थान असल्याचे उघड झाले आहे.

तक्रारदार नंदा मारोती पाटील (रा. समतानगर, किनवट) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा भाऊ विनोद भगत याची पत्नी प्रियंका हिचे शेख रफिक शेख रशीद (रा. साईनगर, किनवट) या इसमासोबत अनैतिक संबंध होते. प्रियंका हिने आपल्या ओळखीच्या शेख रफिकच्या मदतीने विनोद भगत यांच्या नावावर असलेले आरसीसी घर विकले होते. घर विक्रीच्या पैशांबाबत नेहमी वाद होत होते.

२९ ऑगस्ट २०२५ रोजी विनोद भगत अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही तो मिळाला नाही. अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी सीडीआर तपास व चौकशी केली असता, संशयित शेख फयाज शेख अवजोदिन (रा. सुभाषनगर, किनवट) याच्या जबाबावरून संपूर्ण प्रकरण उघड झाले.

चौकशीत उघड झाले की, प्रियंका भगत हिने तिच्या प्रियकर शेख रफिक याच्यासोबत कट रचून, विनोद भगत यांना दारू पाजून खरबी पुलाजवळील पैनगंगा नदीच्या प्रवाहात ढकलून दिले. त्यामुळे विनोद भगत यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी ही घटना लपवून ठेवली आणि पुरावे नष्ट केले.

या प्रकरणी शेख रफिक शेख रशीद (वय ४३, रा. साईनगर, किनवट) आणि प्रियंका विनोद भगत (वय ४१, रा. मथुरानगर, किनवट) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८(अ)(क), ६१(२), १४०(१) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(२)(व्ही) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने किनवट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदर प्रकरण हे पोलीस निरीक्षक चोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय झाडे पोलीस हेडकॉन्स्टेबल डुकरे, प्रदीप कुमार आत्राम. सिद्धार्थ वाघमारे यांच्या पथकाने उघडकीस आणले आहे.