Home वाशिम मंगरुळपीरचा ऐतिहासिक दर्गाह दादा हयात कलंदर कड़े पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष ,

मंगरुळपीरचा ऐतिहासिक दर्गाह दादा हयात कलंदर कड़े पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष ,

181

 

ऐतिहासिक वास्तुचे जतन करण्याची मागणी

फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यासह देशभरात प्रसिद्ध असलेला आणि जगभरातील मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या दर्गाहमध्ये मंगरुळपीर येथील हजरत दादा हयात कलंदर बाबांच्या दर्गाहचा समावेश आहे.तब्बल आठशे वर्षांपुर्वीचा हा दर्गाह आता शिकस्त होत असून, हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुरातत्त्व विभागाने दखल घ्यावी अशी मागणी मुस्लिम करीत आहेत.
मंगरुळपीर येथील हजरत दादा हयात कलंदर दर्गाहला पीरबाबांचा दर्गाह म्हणूनही ओळखले जाते. या दर्गाहवरूनच मंगरुळपीर शहराचे नाव मंगरुळपीर, असे पडले आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी मंगरुळपीर येथे हज़रत सय्यद अहमद कबीर उर्फ दादा हयात कलंदर (र.अ.) पीरबाबांनी मंगलू नावाच्या दैत्याचा पराभव केल्यानंतर शहराला मंगरुळपीर, असे नाव पडले आणि त्या काळातच या दर्गाहची उभारणी झाली अशी आख्यायिका रुढ आहे. वेगवेगळी कारणे आणि उदाहरणे सांगण्यात येत असली तरी, हा दर्गाह सर्वधर्मियांसाठी श्रद्धास्थानही आहे. केवळ मुस्लिम बांधवच नव्हे, तर सर्व समाजबांधव श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येतात. एखाद्या भव्य किल्ल्यासारखा हा दर्गाह आहे. मागील काही वर्षांपासून हा दर्गाह जीर्ण होत चालला आहे. सद्यस्थितीत या दर्गाहचे मुख्य विश्वस्त जहाँगिरदार कुटूंब असून, त्यांच्या मार्गदर्शनात मुस्लिम बांधव या दर्गाहची किरकोळ डागडुजी आणि रंगरंगोटी करून तो जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील गेल्या काही वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र विकासकामांतर्गत या दर्गाहच्या डागडुजीसाठी थोडाफार निधी शासनाकडून मिळाला होता परंतु त्यानंतर आजवर या दर्गाहची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. अशीच स्थिती राहिली, तर हा ऐतिहासिक दर्गाह नामशेष होण्याची शक्यता आहे.