Home बीड राज्यभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठा लढा उभारणार – रोहित धुरंधरे

राज्यभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठा लढा उभारणार – रोहित धुरंधरे

172

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून राज्यात शेतकरी चळवळ अधिक तीव्र करण्याची शेतकरी राजा सामाजिक समितीची घोषणा.

बीड प्रतिनिधी – दिवसेंदिवस शेतकऱ्यांची संकटे वाढतच चालली आहेत. कधी नैसर्गिक आपत्तीने, कधी कर्जबाजारी पणाने, तर कधी शेतीचे भाव खाली पडल्याने वेळोवेळी शेतकरी संकटात सापडतो आहे. राज्यातील शेतकरी हा मेटाकोटीला आला असून राज्यासह मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या चे प्रमाण देखील वाढत चालले आहे. ही सर्व परिस्थिती शेतकऱ्याच्या जागी जाऊन पाहिले तर खूप गंभीर प्रकारची परिस्थिती बनलेली दिसते. मात्र शेतकरी जगला काय आणि मेला काय याचे कोणाला काय असंच भाकीत सर्वत्र बनलेले दिसते. जेव्हा आपल्या घरातील करता व्यक्ती जातो तेव्हा त्याच्या जाण्याची किंमत संपूर्ण परिवाराला भोगावी लागते. राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या असून शेतकरी आत्महत्या चा आकडाही वाढलेला आहे. त्या कमी होण्यासाठी सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करायला हवा. अद्याप पर्यंत सरकारने कर्जमाफीचे धोरण हाती घेतलेले नाही. शेतक-यांना शेतीसाठी लागणारे अवजारे, बि-बियाणे, औषधे, खते यांचे दर भरपूर प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. परंतू शेतक-यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे अशा अनेक प्रश्नावर ‘शेतकरी राजा सामाजिक समिती ‘वतीने दि. 5 ऑगस्ट ते दि. 30 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन दि. 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना पत्र व्यवहार करून समस्या निवेदनमार्फत मांडून शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत शेतकरी राजा सामाजिक समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे शेतकरी राजा सामाजिक समिती चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी प्रसार माध्यमाद्वारे कळविले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार डोळेझाक करत आहे. परंतु शेतकरी राजा सामाजिक समिती शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर लक्ष देऊन त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून, त्यांच्या समस्या सोडवण्यास खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. येणाऱ्या 30ऑगस्ट रोजी शेतकरी राजा सामाजिक समिती मार्फत राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आम्ही आयोजित करत असल्याचेही शेतकरी राजा सामाजिक समितीचे प्रदेशाध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी सांगितले.