
दारव्हा – दिग्रस विधानसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा जनसेवा करण्याची संधी देऊन जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. माझा हा विजय मी दिग्रस मतदारसंघातील जनतेसह माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांना आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना समर्पित करतो, असे भवोद्धगार संजय राठोड यांनी विजयानंतर काढले.
दारव्हा येथे मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संजय राठोड यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. यावेळी संजय राठोड यांचा परिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संजय राठोड भावूक झाले होते. त्यांनी आपला विजय हा जनतेचा विजय असून, पाचव्यांदा विजयी करून दिग्रस मतदारसंघाच्या विकासाला नागरिकांनी साद घातली, असे मत व्यक्त केले. विरोधकांनी दिग्रस मतदारसंघात तेलंगणातील मुख्यमंत्र्यांपासून आमदार, खासदार संपूर्ण टीम माझ्याविरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी तैनात केली होती. मात्र येथील कट्टर शिवसैनिक, महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि जनतेने सर्व समावेशक विकासाला साथ दिली. भविष्यात दिग्रस मतदारसंघ महाराष्ट्रात विकासाचा मॉडेल ठरेल, असे यावेळी संजय राठोड म्हणाले. येथील जनतेच्या ऋणातून कधीच उतराई होणार नाही. जनतेचे हे निर्वाज्य प्रेम आणि आशीर्वाद हेच आपले बळ आहे, असे ते म्हणाले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी दारव्हा येथे संजय राठोड यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.












































