
➡️ घाटंजी तालुकाध्यक्ष गोर सेना – गणेश राठोड
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही गोर गणसमाज, विमुक्त भटक्यांसह इतर मागासवर्गीय समाजाचे सुमारे ११५ कोटी लोक हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण, सत्तेतील वाटा आणि सामाजिक न्याय आणि मान सन्मान या मुलभुत सोई सुविधांपासुन वंचित आहेत. बहुसंख्य असलेल्या लोकांचे हे अधिकार हिसकावून घेणारे प्रस्थापित कोण आहेत? आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भाषिक, धार्मिक आणि राजकीय विकासापासून बहुसंख्य लोकांना दूर करणारे कोण आहेत? बहुसंख्य लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणारे कोण आहेत याचा शोध घेण्याची आज नितांत गरज आहे. म्हणुन भारतीय राज्यघटने नुसार या समाजातील वंचित, शोषित, पिडीत, उपेक्षित घटकांना मिळालेल्या हक्क अधिकारांवर गदा आणू पाहणारया जातीयवादी, विषमतावादी, भेदभाववादी, धुर्त, ढोंगी, लबाड सरकारला वठणीवर आणण्यासाठी येत्या ११ मे रोजी गोर सेनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर क्रांतीकारी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनेक संघटनांनी प्रा. संदेश चव्हाण यांचे नेतृत्व मान्य केले असून सदर मोर्चाला अनेक संघटनांनी पाठिंबा जाहिर केला आहे. सदर मोर्चात ओबीसी प्रवर्गातील सर्व जातीसमुहांनी सरकारच्या बहुसंख्य विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याची नितांत गरज आहे.
भारत सारख्या देशात कुञ्या मांजरांची जनगणना करण्यात येते परंतु एका मोठ्या जातीसमुहांकडून जातीनिहाय जनगणनेची मागणी मात्र धुडकावून लावण्यात येत आहे. १९३१ हे जाती निहाय जनगणना झालेले शेवटचे वर्ष. म्हणजेच गेल्या ९१ वर्षात जातीनिहाय जनगणना झाली नाही. मात्र, गेल्या दोन दशकांपासून जातनिहाय जनगणना करावी ही मागणी सर्वच मागास समाज घटकांमधील राजकीय नेतृत्व आणि सामाजिक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे. जातीनिहाय जनगणना करावी या मागणी संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात ठराव घेवून केंद्र शासनाकडे निवेदने पाठवली आहेत. तसेच संसदेत देखील जातनिहाय जनगणना करावी यावर अनेकदा चर्चा झाली आहे. संसदेत चर्चा चालू असतांना मागास जातीतील अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी देखील केली. मात्र, राजकीय व्यवस्थेतील उच्च पातळीवरून (केंद्र सरकारकडून) जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीला ग्रीन सिग्नल मिळाला नाही. नेमका कां मिळत नाही? कोणत्या समाजाचे – नेतृत्वाचे हितसंबध जातीनिहाय जनगणना केल्याने धोक्यात येणार आहेत? जातीनिहाय जनगणना करण्यास विरोध का करण्यात येत आहे, हे मात्र एक न समजणारे कोडेच आहे.
देशात जातीनिहाय जनगणना झाली तर सर्व जातीसमुहांच्या लोकांची नेमकी लोकसंख्या किती याचा आकडा कळेल. त्यांची आर्थिक, शैक्षणिक, राजकीय स्थिती कळून येईल. त्यांच्यासाठी सार्वत्रिक निवडणूकीत मतदारसंघ राखीव ठेवावे लागतील. त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तेतील वाटा द्यावा लागेल. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची व्यवस्था करावी लागेल. या सर्व बाबींमुळे येथील प्रस्थापित पंधरा टक्के लोकांना जबर हादरा बसू शकतो. यामुळेच गेली कित्येक वर्षापासून जातीनिहाय जनगणनेची मागणी धुडकावून लावण्यात येत आहे. हा पंच्याऐंशी टक्के लोकांवर येथील प्रस्थापित सत्ताधारी लोकांकडून करण्यात येणारा अन्याय नव्हे काय? तसेच इतर मागासवर्गीय जातीसमुहातील विमुक्त भटक्यांना क्रिमिलेअरच्या जाचक अटीचे जे दिव्य पार करावे लागते ते वेगळेच. या जाचक अटीमुळे विमुक्त भटक्या प्रवर्गातील विद्यार्थी व नोकरवर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. सारथी व बार्टीच्या धर्तीवर विमुक्त भटक्या व ओबीसी प्रवर्गातील लोकांकरीता शैक्षणिक सवलती देण्यात याव्यात. चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आलेले जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा पातळीवर न ठेवता विभागीय स्तरावर ठेवण्यात यावे. विभागीय स्तरावर ठेवण्यात आलेल्या समितीत मागासवर्गीय जातीसमुहांना प्रतिनिधीत्व देण्यात यावे. संयुक्त मुख्य परिक्षा २०२१ लवकरात लवकर घेण्यात यावी. सर्व कर्मचारी यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करून शासकीय व निमशासकीय विभागातील रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यात यावा. या व इतर अनेक प्रलंबित मागण्या सदर क्रांतीकारी विराट मोर्चात करण्यात येणार आहे.
शासन व प्रशासन यांच्याकडून सदैव जनतेवर होणा-या अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठणारी एकमेव संघटना म्हणून गोरसेना सर्वपरिचित आहे. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण याना सर्वच घटक मानणारा आहे तरी या वेळेस समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून आपणही क्रांतीकारी विराट मोर्चाला उपस्थित राहून प्रस्थापित जातीवादी, विषमतावादी, भेदभाववादी, धुर्त, लबाड, ढोंगी राजकीय लोकांना धडा शिकविण्यासाठी आणि आपल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गोर सेनेचे घाटंजी तालुकाध्यक्ष गणेश राठोड, यशवंत राठोड, पवन आडे, आशिष आडे, गजानन चव्हाण, कुणाल चव्हाण, सैलू राठोड, मनोज चव्हाण, बादल जाधव, अंकुश राठोड, दिनेश राठोड, नरेश चव्हाण व ईतर पदाधिकारी यांनी केले आहे.











































