Home यवतमाळ समाज जीवनात भूतदयेतूनच होते सेवाकार्य – बाळासाहेब नाईक यांचे प्रतिपादन

समाज जीवनात भूतदयेतूनच होते सेवाकार्य – बाळासाहेब नाईक यांचे प्रतिपादन

504

 

जीवस्नेही संस्थांना श्वानपथकाचे मार्गदर्शन, पोलीस अधीक्षकांचा पुढाकार

मनुष्याच्या आचार विचारात प्रेम वात्सल्य असेल तर बहुतांश कुठलाही प्राणी त्यास इजा पोहोचवणार नाही. समाज जीवनात अशाच भूतदयेतून सेवाकार्य घडत असल्याचे प्रतिपादन श्वानपथक व बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख श्री बाळासाहेब नाईक यांनी केले. बुधवारी (27 एप्रिल) सकाळी पोलीस मुख्यालय येथे आयोजित अँनिमल वेलफेअर विषयात सेवारत संस्थांना प्रशिक्षण देतांना ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री दिलीप पाटील भुजबळ यांच्या पुढाकारातून यवतमाळात प्रथमच पोलीस आणि जीवस्नेही संस्थांचा सेवासंगम घडून आला.
नाईक म्हणाले की, माणसाप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही संवेदना असतात. त्यांचेशी लळा लावल्यास तेही तशा भावना आपल्या कृतीतून व्यक्त करतात. आपल्या भागात अँनिमल वेलफेअर विषयात हळूहळू जनजागृती सुरू असून यवतमाळातील जीवस्नेही संस्थांच्या कार्याचे कौतुक केले. श्वानांच्या अनेक प्रजाती नम्र, मैत्रीपूर्ण असल्या तरी मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत पशुप्रेमींनी त्यांची सेवाशुश्रूषा करतांना दक्षता घेण्याचा सल्लाही श्री नाईक यांनी दिला.
यावेळी श्वान पथकातील लुसी, कँडी, जॅक, गती या श्वानांनी नानाविध प्रात्यक्षिकांद्वारे आपली चपळता व बुद्धिमत्ता दाखवून दिली. बॉम्बशोधक पथकाचे श्री निलेश घोगरे यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन करीत श्वानांच्या इतिहासापासून तर श्वानांच्या सांकेतिक भाषा, लक्षणे, खाद्य, फिटनेस, गुणधर्म, उपचार, निगा आदी अनेक संबंधित विषयांचे अनुभव मार्गदर्शन विषद केले तर अश्विन सवालाखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
श्वान पथकातील सर्वश्री मंगेश आजने, रितेश माटे, मधुकर तोडसाम, सुनील पजगाडे, संतोष कडू, किशोर एडमे यांनी प्रात्यक्षिकांकरिता सहकार्य केले. उन्हाळ्यात पाण्यासाठी पशुपक्ष्यांची होरपळ व वणवण होऊ नये म्हणून एक हात मदतीचा संस्थेतर्फे पोलीस मुख्यालय परिसरात मातीचे जलपात्र लावण्यात आले. संस्थेच्या सेवाकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे श्वान पथकातील तज्ञ अधिकारी आणि प्रशिक्षकांनी शंकासमाधन केले. यावेळी बी काइंड संस्थेचे ऍड अमोघ व्होरा, अभिजित गुल्हाने लिटिल पॉझ संस्थेचे जय कारिया, दिव्या शर्मा ओलावा फाउंडेशनचे डॉ अलोक गुप्ता, सुमेध कापसे, कृष्णा गंभीर, ऋषिकेश होरे, निलेश पेंडले, मयांक अहिर, हेमंत राठोड, सचिन काकडे, प्रज्वल गणवीर, एक हात मदतीचा संस्थेचे दिनेश तिवाडे, अर्जुन पारवेकर, कुणाल सिडाम, अभिषेक सिडाम, तुषार सुलभेवार आदी सेवाकर्ते उपस्थित होते.