Home यवतमाळ कुर्ली ग्रामीण बँकेचे रोखपाल गणपत आसुटकर यांच्या जामीन अर्जावर २२ मार्च रोजी...

कुर्ली ग्रामीण बँकेचे रोखपाल गणपत आसुटकर यांच्या जामीन अर्जावर २२ मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी..!

213

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे रोखपाल गणपत रामेश्वर आसुटकर यांनी बँकेत अपहार केल्याच्या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज यवतमाळचे न्यायाधिश १ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांनी फेटाळला होता. दरम्यान, आरोपी गणपत आसुटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून त्याची सुणावणी २२ मार्च रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. आरोपीतर्फे अँड ए. ए. धवस हे काम पाहत आहे. तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अँड. व्हि. ए. ठाकरे उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. तथापि, आरोपी गणपत आसुटकर विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात संगणमत करुन अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. उदय पांडे यांनी युक्तिवाद केला होता. तर आरोपीची बाजु अँड. एस. एस. मांढळे यांनी मांडली होती.
घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत फिर्यादी गिरजा श्रीकृष्ण आडे हिने सन २०२० रोजी बचत खाते उघडले होते. सदर खात्यात शेतातील पिकाची रक्कम खातेदार वेळोवेळी टाकत असे. फिर्यादी गिरजा हिने १४ मे २०२० रोजी ४९ हजार ९९९ रुपये व १६ जुलै २०२० रोजी ५० हजार रुपये बँकेत जमा केले होते. फिर्यादीच्या मुलीचे लग्न असल्याने तिने पैसे विड्राल करण्यासाठी ३ जानेवारी २०२२ रोजी बँकेत गेली होती. मात्र, नव्याने रुजू झालेले रोखपाल राजु राजुरकर यांनी खात्याची पाहणी केली असता खात्यात ५० हजार रुपये कमी असल्याचे रोखपालाने खातेदारास सांगितले. त्यामुळे तिला धक्का बसला. बँकेत रक्कम जमा करते वेळेस गणपत आसुटकर हे बँकेत रोखपाल म्हणून कार्यरत होते. तसेच कुर्ली येथील पांडुरंग मडावी यांचे ५० हजार रुपये सुद्धा बँकेत जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोघांचीही फसवणुक झाली. सदर प्रकरणाची लेखी तक्रार गिरजा श्रीकृष्ण आडे हिने पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या वरुन ठाणेदार विनोद चव्हाण यांनी आरोपी रोखपाल गणपत आसुटकर विरुद्ध भादंवि कलम ४०९, ३४ संगणमत करुन अपहार केल्याचा गुन्हा नोंद केला होता. पारवा पोलीस आरोपी यांस अटक करण्यासाठी त्याच्या मुळ गांवी वणी येथे अनेकदा गेले असता आरोपी हा घरी आढळुन आला नाही. सदर प्रकरणाचा पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्याने आरोपी गणपत आसुटकर याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज (एबीए) क्रमांक १६४/२०२२ दाखल केला आहे. सदर प्रकरणात २२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.